कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टसने (सीएएस) भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटच्या याचिकेवरील निर्णय मंगळवारी लांबणीवर टाकला. आता यावर 16 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी फैसला होणार आहे. विनेशच्या याचिकेवर आधी ऑलिम्पिक संपण्याआधी अर्थात 11 ऑगस्टपूर्वी निर्णय होणार होता. नंतर तो 13 ऑगस्टला होईल, असे जाहीर करण्यात आले. मात्र मंगळवारी हा निर्णय आणखी लांबणीवर गेला.
विनेश फोगट खटल्याच्या निकालाची तारीख पुन्हा एकदा 16 ऑगस्टपर्यंत वाढवल्यानंतर तिचे काका महावीर फोगाट यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. विनेशच्या निर्णय पुन्हा पुढे ढकलल्याने महावीर फोगाट संतापल्याचे दिसून आले. महावीर फोगाट म्हणाले की, आम्ही 5-6 दिवसांपासून निर्णयाची वाट पाहत आहोत. पण तारीख पे तारीख दिली जात आहे. तरीही आम्ही निकालीची वाट पाहू आणि आमच्यासह संपूर्ण भारत विनेशच्या निर्णयाची वाट बघत आहे.