राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून आता 8 दिवस झाले, पण अद्यापही सरकार स्थापन झाले नाही. विशेष म्हणजे भाजप महायुतीला 237 जागांसह मोठं बहुमत मिळालं आहे.त्यामध्ये, भाजपने 132 जागांवर विजय मिळवला असून शिवसेना शिंदे गटाला 57 जागा जिंकता आल्या आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 41 जागा जिंकल्या असून सध्या तिन्ही पक्षांच्या बैठकांचा धडाका सुरू आहे.
दिल्लीत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे हे आपल्या गावी गेले असून भाजप नेते पक्षाच्या पदाधिकारी व आमदाराच्या बैठकी घेत आहेत. त्यामुळे, महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण याचे उत्तर अद्याप मिळालेलं नाही. मात्र, महाराष्ट्राच्या 31 व्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता होणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.