माझी मुलगी-मुलगा, आजी-आजोबा, आई-वडील एसटी बसमधून पुणे, मुंबई किंवा अन्य दूरवरील ठिकाणावरून येत आहेत, पण त्यांचा फोन लागत नाही. त्यांना त्या मार्गाची फार माहिती नाही, ते कुठपर्यंत आले असतील, ही चिंता आता प्रत्येकाला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम’द्वारे दूर होणार आहे.बसची वाट पाहात तासन्तास बस स्थानकावर देखील थांबावे लागणार नाही.
कोणत्या मार्गावरील, कोणती एसटी बस कधीपर्यंत स्थानकावर येईल, याची माहिती आता त्या ॲपद्वारे घरबसल्या समजणार आहे.आतापर्यंत महामंडळाच्या ताफ्यातील दहा हजार बसगाड्यांना ‘जीपीएस’ सिस्टिम बसविण्यात आली आहे. आता, त्या यंत्रेणीची सद्य:स्थिती काय, याची पडताळणी केली जात आहे. याशिवाय उर्वरित पाच हजार बसगाड्यांनाही ही यंत्रणा बसविली जाणार आहे. त्यासंबंधीची यंत्रणा महामंडळाकडे उपलब्ध असून, नवीन वर्षात आता प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
एसटी बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला किंवा काही अडचणीमुळे वेळेनुसार बस स्थानकावर पोचायला विलंब होत असल्यास त्याची माहिती देखील त्या ॲपद्वारे समजणार आहे. अनधिकृतपणे बस कोठे थांबविली जाते का किंवा ज्या ठिकाणी थांबा आहे तेथे नियोजित वेळेपेक्षा जास्तवेळ बस थांबविली जातेय का, याची देखील माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजेल. एकूणच या यंत्रणेमुळे लालपरीच्या वेळापत्रकात सूसूत्रता येणार असून, प्रवाशांनाही बसगाड्यांच्या वेळेचा भरोसा मिळणार आहे.
