हुपरी शहरातील चांदी व्यवसायिकांना दरातील चढ उताराचा फटका 

हुपरी शहरातील दागिने निर्मितीवर आंतरराष्ट्रीय अस्थिर परिस्थितीचा परिणाम झाला असून चांदी सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण सुरू आहे. दोन दिवसांत चांदी प्रति किलो दरात तब्बल १२ हजारांची तर सोन्यामध्ये दर १० ग्रॅमला ३ हजारांची तफावत व्यापारी वर्गाला चटका लावून गेली आहे. यामुळे दर स्थिर रहातील का? याकडे व्यापारी वर्ग डोळे लावून बसले आहेत. अमेरिकेने जाहिर केलेल्या आयात करांमुळे जगभरातील शेअर बाजार कोसळले असून सोन्या-चांदीचे दरही मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. यामुळे जादा दराने खरेदी केलेल्या उद्योजकांची पंचाईत झाली आहे. अस्थिर परिस्थितीमुळे दागिने परपेठेवर पाठवताना व्यवहार करणे जोखमीचे होऊन बसले आहे.

आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर भाव वाढून बाजारात विचित्र परिस्थिती निर्माण झाली असून हपरी पंचक्रोशीत कारागिरांची जगण्याची लढाई अवघड होऊन बसली आहे. हाताला काम नाही यामुळे आर्थिक संकटाचा सामना सर्वांनाच करावा लागत आहे. चांदी उद्योजक, धडी उत्पादक व यांवर अवलंबून असणाऱ्या हजारो पूरक उद्योगांना याचा फार मोठा फटका बसला आहे. हाताला कामच नसल्याने जगायचे कसे हा प्रश्न आवासून उभा आहे. मागणी- उत्पादन- पुरवठा आणि विक्री ही साखळी तुटली आहे. जवळपास शेकडो कारागीरांच्या हातातून या दागिन्यांची निर्मिती केली जाते या सर्वांची प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक कोंडी झाली आहे.