तारदाळ,(Tardal) खोतवाडी या दोन्ही गावांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या अंतर्गत ५२ कोटींची जल जीवन योजना मंजूर झाली आहे. सदर योजनेचे काम मागील तीन वर्षापासून अत्यंत संथ गतीने सुरू आहे. सदरची योजना मार्च २०२५ अखेर पूर्ण होणे आवश्यक होते. प्रांत अद्यापी योजनेचे काम पन्नास टक्के देखील पूर्ण झाले नाही. या योजनेचे संबंधित अधिकारी व मक्तेदार यांना गावातील लोकप्रतिनिधी यांनी वारंवार योजनेसंबंधी असणाऱ्या त्रुटींची कल्पना देऊन देखील सदरची योजना पूर्ण रखडलेली दिसत आहे.
सदर कामासंबंधी असणारे जलकुंभ तसेच पाईपलाईन अद्यापी अपूर्णच असल्याने जल जीवन योजना पूर्ण होणार की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. या गंभीर समस्याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे असून संबंधित विभागाचे अधिकारी व मक्तेदार यांची चौकशी करून यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी अशा मागणीचे पत्र माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद कोराने यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांताधिकारी यांना दिले आहे. या योजनेसाठी केंद्र व राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला असूनही योग्य नियोजनाअभावी ग्रामस्थांना अद्याप पाणी मिळत नाही. त्यामुळे जलजीवन योजनेच्या संबंधीत अधिकारी, मक्तेदार यांची सखोल चौकशी व्हावी अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कोराणे यांनी दिला आहे
