अभिनेत्री अमृता सुभाष आणि सोनाली कुलकर्णी यांच्या ‘परिणती’ (Parinati) सिनेमाची सध्या चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच सिनेमाचं पोस्ट समोर आलं होतं. आता या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘परिणती’ – बदल स्वतःसाठी’ असं या सिनेमाचं नाव आहे. या आगामी मराठी चित्रपटाच्या पोस्टरनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. मराठी सिनेविश्वातील दोन लोकप्रिय अभिनेत्री अमृता सुभाष आणि सोनाली कुलकर्णी यांना एकत्र पाहाण्याची उत्सुकता वाढली असतानाच, नुकताच प्रदर्शित झालेला या चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे.
चित्रपटाच्या नावावरूनच आणि पोस्टरमधून हा स्त्रीप्रधान चित्रपट असल्याचे स्पष्ट होतंय. ही कथा आहे दोन वेगळ्या पार्श्वभूमी असलेल्या स्त्रियांची आहे. त्यांच्या अनपेक्षित भेटीची, वाढत चाललेल्या मैत्रीची आणि संघर्षातून सशक्तपणे उभ्या राहिलेल्या आयुष्याची. हे ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं.
ट्रेलरमध्ये अमृता सुभाष एका डॉक्टरच्या भूमिकेत दिसत असून, ती आपल्या नवऱ्यासोबत आणि मुलासोबत एक सुखी कुटुंब जगत आहे. परंतु अचानक तिचं आयुष्य एका वेगळ्याच वळणार येतं. तिच्या आयुष्यात मोठं काही तरी घडतं. ज्यामुळे ती मानसिकदृष्ट्या खचलेली दिसते. याचवेळी सोनाली कुलकर्णी, जी एका बार डान्सरची भूमिका साकारत आहे, ती अमृताला आधार देण्यासाठी पुढं येते. सोनालीचा सकारात्मक दृष्टिकोन आणि तिच्या स्वाभाविक सहानुभूतीमुळं, दोघींमध्ये एक हळुवार आणि घनिष्ट मैत्री निर्माण होत असल्याचं ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अक्षय बाळसराफ म्हणतात, ‘परिणती’ ही दोन स्त्रियांची गोष्ट आहे, परंतु त्याहूनही अधिक ती त्यांच्या अस्तित्वाच्या शोधाची कहाणी आहे. वेगळ्या पार्श्वभूमीच्या, स्वभावाच्या या दोन पात्रांच्या भेटीतून निर्माण होणारी मैत्री ही केवळ भावनिक आधार नसून, ती परस्परांची नवी ओळख घडवणारी शक्ती आहे. ‘परिणती’ मला वाटतं, प्रत्येकासाठी एक आरसा आहे, जो आपल्याला दाखवतो की, परिस्थिती काहीही असो, स्वतःवर विश्वास असेल तर आपण पुन्हा उभं राहू शकतो.
१ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणारा ‘परिणती – बदल स्वतःसाठी ’ हा चित्रपट एक भावनिक अनुभव देणारा आणि प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणारा ठरणार आहे, याची झलक ट्रेलरमधून स्पष्टपणे दिसतेय.
