ऑगस्टअखेरपर्यंत नवे उपराष्ट्रपती; निवडणूक आयोगाकडून प्रक्रिया सुरु

जगदीप धनखड यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने प्रक्रिया सुरू केली आहे. निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा याच आठवड्यात होण्याची शक्यता असून, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत नवीन उपराष्ट्रपतींची निवड होईल असे मानले जाते.

उपराष्ट्रपतिपदाची (Vice President) निवडणूक घेण्याची जबाबदारी आयोगाची आहे. गृहमंत्रालयाने मंगळवारी धनखड यांच्या राजीनाम्याची औपचारिक घोषणा करताच, निवडणूक आयोगाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीशी संबंधित १९५२च्या लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, निवडणूक आवश्यक ठरली तर अधिसूचना प्रसृत झाल्यापासून ३२ दिवसांच्या आत त्या पदासाठी निवडणूक घेणे बंधनकारक असते. नियमांनुसार, निवडणुकीची अधिसूचना प्रसृत झाल्यापासून १४ दिवसांच्या आत पात्र उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात.

निवडणुकीचा दिवस जाहीर करण्यापूर्वी आम्ही ‘इलेक्टोरल कॉलेज’ तयार करण्यासारख्या काही गोष्टींवर काम करत आहोत, असे आयोगाने म्हटले आहे. या अंतर्गत, लोकसभा आणि राज्यसभेच्या सर्व विद्यमान सदस्यांची मतदारयादी तयार केली जाईल. त्यानंतर निवडणूक अधिकारी आणि सहायक निवडणूक अधिकाऱ्यांबाबत निर्णय घेतला जाईल, असे आयोगाचे म्हणणे आहे. उपराष्ट्रपतिपदासाठी, सत्ताधारी पक्षांसोबत, विरोधी पक्षांनाही उमेदवार उभा करण्याचा अधिकार आहे. विरोधी पक्ष उमेदवार उभा करत नसतील तर सत्ताधारी पक्षांचा उमेदवार बिनविरोध निवडून येऊ शकतो.