अदानी समूहाची कंपनी अदानी पॉवरने (Adani Power) शुक्रवारी एप्रिल-जून तिमाहीचे निकाल जाहीर केले. या निकालांसोबत कंपनीने आपल्या शेअरचे विभाजन म्हणजेच स्टाॅक स्प्लिट ची घोषणा केली आहे. Adani power चा एक शेअर पाच शेअर्समध्ये विभागला जाणार आहे. कंपनीने सांगितले की, त्यांच्या संचालक मंडळाने १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक शेअरचे २ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या ५ शेअर्समध्ये विभाजन करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. कंपनीच्या इतिहासात पहिल्यांदाच स्टॉक स्प्लिट होत आहे.
Adani power ने म्हटले आहे की जून तिमाहीत त्यांचा एकत्रित निव्वळ नफा १३.५ टक्क्यांनी घसरून ३,३८४ कोटी रुपयांवर आला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत नफा ३,९१३ कोटी रुपयांवरून होता. त्याच वेळी या कालावधीत कंपनीचा एकत्रित महसूल ६ टक्क्यांनी घसरून १४,१०९ कोटी रुपयांवर आला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत १४,९५६ कोटी रुपयांवरून होता.
स्टाॅक स्प्लिट कंपनीच्या भागधारकांच्या मान्यतेच्या अधीन आहे. भागधारकांची मान्यता मिळाल्यानंतर, याची रेकॉर्ड तारीख निश्चित केली जाईल आणि गुंतवणूकदारांना माहिती दिली जाईल. कंपन्यांच्या शेअर्सची पारदर्शकता आणि तरलता वाढवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. यामुळे गुंतवणूकदारांना शेअर्स खरेदी करणे आणि विक्री करणे सोपे होईल.
अदानी पॉवरचे शेअर्स एनएसईवर १.४१ टक्क्यांनी घसरून ५७९.८० रुपयांवर आले आहेत. गेल्या एका महिन्यात कंपनीचे शेअर्स २ टक्क्यांनी घसरले आहेत. मात्र, या वर्षाच्या सुरुवातीपासून शेअर जवळपास १० टक्क्यांनी वाढला आहे.
