ठाकरेंनी युती केलेल्या निवडणुकीच्या आधीच फडणवीस सरकारचा मास्टर स्ट्रोक

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राज्यातील कोणकोणते राजकीय पक्ष युती आणि आघाड्या करणार याबद्दलचा संभ्रम अद्याप कायम आहे. मात्र काही पक्षांनी यासंदर्भातील चाचपणी सुरु केली आहे. यामध्ये सर्वात आघाडीवर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. हिंदी भाषेचा पहिलीपासून अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या मुद्द्यावरुन विरोध करण्यासाठी 5 जून रोजी दोन्ही ठाकरे बंधू मनसेच्या स्थापनेनंतर 19 वर्षांनी एकाच मंचावर आले. त्यानंतर राज ठाकरे उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ‘मातोश्री’वर पोहोचले. याच संभाव्य युतीची नांदी म्हणून बेस्ट कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीमध्ये दोन शिवसेनेंनी युती केली आहे. असं असतानाच आता या युतीच्या घोषणेनंतर एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

दोन्ही ठाकरे एकत्र
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीच्या माध्यमातून दोन्ही ठाकरे बंधुची युती होणार आहे. ठाकरेंची बेस्ट कामगार सेना आणि मनसेची बेस्ट कामगार कर्मचारी सेना यांची युती झाली आहे. बेस्टच्या निवडणुकीत उत्कर्ष पॅनल म्हणून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. बेस्टच्या पतपेढी निवडणुकीच 18 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. बेस्टच्या निवडणुकीत 21 जागापैकी ठाकरेंची सेना 19 तर मनसे 2 जागा उत्कर्ष पॅनल म्हणून एकत्रित लढणार आहे.

पतपेढीच्या या निवडणुकीत पहिल्यांदाच दोन्ही ठाकरे एकत्र आले आहेत. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्रित निवडणूक लढणाऱ्या बेस्ट पतपेढीची चौकशी होणार आहे. बेस्ट कर्मचारी सहकारी पतसंस्था तसेच पतपेढीवर काही सभासदांना महाराष्ट्र सरकारअंतर्गत येणाऱ्या सहकार विभागाची नोटीस आली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 89 अंतर्गत तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. 2024-25 मधील सर्व आर्थिक व्यवहार आणि कामकाजाची चौकशी केली जाणार आहे. मागील नऊ वर्षे या पतपेढीवर ठाकरे गटाची सत्ता होती, या चौकशीसाठी द्विसदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे.

गजानन गायकवाड यांची तपासणी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर जितेंद्र इंद्रलाल चटर्जी यांची सहायक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 29 ऑगस्ट 2025 पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शिवसेना ठाकरे गटाच्या पॅनेलमधून शिवसेना शिंदे गटाची महिला पदाधिकारी निवडणूक लढत आहे. शिवसेना शिंदे गटाच्या भायखळा विधानसभा संघटिका बबिता पवार यांचा बेस्ट कामगार सेनेच्या उत्कर्ष पॅनेलमध्ये समावेश आहे. बबिता पवार या शिंदे गटाच्या माजी आमदार यामिनी जाधव यांच्या निकटवर्तीय आहेत. बबिता पवार यांना पॅनेलमध्ये घेतल्याने ठाकरे गटातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची नाराजी आहे. बबिता पवार पक्षात प्रवेश घेत असेल तरच त्याची उमेदवारी कायम ठेवा, अन्यथा त्यांना पॅनेलमधून बाहेर काढा असा पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक पदाधिकारी यांनी वरिष्ठांची भेट घेवून नाराजी कळवली आहे. अंतर्गत गोंधळ असतानाच आता या पतपेढीच्या चौकशीचा घाट सरकारने घातला आहे.