हेरलेत कावीळ रुग्णांमध्ये वाढ

हातकणंगले तालुक्यातील हेरले गावात दूषित पाण्यामुळे काविळीच्या साथीने थैमान घातले आहे. शंभराहून अधिक नागरिकांना काविळीची लागण झाली आहे. कोट्यवधी रुपये खर्चूनही पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरल्याने आणि ग्रामपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर प्रकारानंतरही प्रशासन सुस्त असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पंधरा हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या हेरले गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेवर मोठा खर्च होऊनही थेट तलावातून गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी पुरवले जात असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. गावातील इतर पाण्याचे स्रोतही अस्वच्छतेच्या विळख्यात सापडल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामसभेत काही युवकांनी काविळीच्या धोक्याकडे लक्ष्य वेधले होते; मात्र पदाधिकारी आणि प्रशासनाने या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष केले. या गंभीर परिस्थितीवर ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक संघटनांनी दिला आहे.