बापूसो शिंदे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आष्ट्यात (Ashtya) विविध ठिकाणी गांजा विक्रीसह सुरु असलेले अवैध धंदे बंद करण्याबाबत आष्टा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी सत्यजित आवटे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, आष्ट्यात विविध ठिकाणी गांजा विक्री राजरोसपणे सुरू आहे. आष्टा व परिसरातील युवा पिढी या व्यसनाकडे वळताना दिसत आहे. गांजा विक्रीकडे आता लक्ष दिले नाही तर भविष्यामध्ये ही सर्व तरुणाई व्यसनाधीन होऊन त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त होण्यास वेळ लागणार नाही. तरुणांच्या भविष्यासाठी गांजा विक्री बंद होणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास गुन्हेगारी वाढीस चालना मिळू शकते. सदर निवेदन आष्टा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक सत्यजित आवटे व अमर कोराडे यांना देण्यात आले. यावेळी संग्राम शिंदे, डी. एस. कोळी, रवी इंगळे, साजन औघडे, महादेव कोळी, अविराज थोरात, प्रसाद कवठेकर, शहाजान जमादार, अमित थोटे उपस्थित होते.
आष्ट्यातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी
