संसदेत CISF तैनात करण्यावर गृहमंत्रानी स्पष्टच म्हटलं

भारताच्या राजकीय पटलावर अनेक घडामोडी घडत असून, त्यात सर्वात मोठी घडामोड म्हणजे संसदेमध्ये सीआयएसएफचं पथक तैनात करणं. शनिवार 23 ऑगस्ट 2025 रोजी संसदभवन परिसरामध्ये काही संशयास्पद हालचाली पाहायला मिळाल्या. जिथं सीआयएसएफनं (CISF) एका व्यक्तिला संशयास्पद स्थितीमध्ये वावरण्याप्रकरणी ताब्यात घेतलं. या व्यक्तीकडे असणारी कागदपत्रसुद्धा तपासण्यात आली.

तत्पूर्वी 22 ऑगस्ट 2025 रोजी एक व्यक्ती संरक्षक भिंत ओलांडून ससंदेत आल्याची घटना घडली. ज्यानंतर सुरक्षिततेच्या मुद्द्यांवरून आता संसदेत सीआयएसएफ तैनातीसंदर्भात खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या.

वृत्तसंस्थेशी संवाद साधताना अमित शाह यांनी संसदेतील CISF तैनातीसंदर्भातील भूमिका स्पष्ट करत म्हटलं, ‘मार्शल सदनात तेव्हाच येतील जेव्हा सभापतींकडून त्यांना तसा आदेश दिला जाईल. हा बदल एका मोठ्या घटनेनंतर झाला आहे. जेव्हा काही डाव्या विचारसणीच्या मंडळींचा सदनात सुळसुळात वाढला आहे. त्यांना (विरोधकांना) काही हरकती दर्शवत नागरिकांमध्ये गोंधळाचं वातावरण तयार करायचं आहे. तीन निवडणुकांमधील पराभवानंतरच्या मनस्तापामुळं त्यांची सद्सद्विवेकबुद्धीसुद्धा नाहीशी झाली आहे.’

विरोधकांकडून सीआयएसएफ जवानांच्या तैनातीवरून होणारा वाद पाहता या निर्णयामागचा नेमका हेतू स्पष्ट केल्यानंतर आता विरोधक सत्ताधाऱ्यांच्या या भूमिकेवर कसे व्यक्त होणार हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं असेल.