विटा, खानापूर तालुक्यातील रेणावी, रेवणगाव, लेंगरे, भूड, वासंबे, कुर्ली, पारे, बलवडी(खा.), जाधववाडी, मेंगाणवाडी, धोंडेवाडी,भडकेवाडी या गावांतील शेतजमिनी पवनचक्की कंपन्यांनी पवनउर्जा प्रकल्प उभा करण्यासाठी शेतकऱ्याकडून अत्यंत कमी किमतीत खरेदी केलेल्या आहेत. यापैकी काही ठिकाणी पवनचक्या उभा केलेल्या आहेत. परंतु अनेक पनवउर्जा प्रकल्प उभा करणेसाठी खरेदी केलेल्या जमिनीवर पवनऊर्जा प्रकल्प उभा केलेले नाहीत अशा जमिनी मूळ शेतकऱ्यांना परत दिल्या जाव्यात अशी मागणी तहसीलदार खानापूर – विटा यांचेकडे केली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते माजी सभापती ॲड. बाबासाहेब मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी अॅड. मुळीक म्हणाले की, पवनऊर्जा प्रकल्प उभा न केलेल्या जमिनी कंपनीच्या दलालांमार्फत मोठ्या किमतीस विक्री करण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे. यापैकी काही जमिनी विक्री झालेल्या आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पवनचक्की प्रकल्प उभारून शिल्लक राहिलेल्या जमिनी मूळ शेतकऱ्यांनाच परत दिल्या जाव्यात तसेच पवनचक्की कंपनी दलालांमार्फत शेतजमीन विक्रीस स्थगिती दिली आहे. याशिवाय पवनउर्जा प्रकल्पासाठी घेतलेल्या जमिनींबाबत झालेले संशयास्पद व्यवहार तपासून फेरफार रद्द करण्याचेही निर्देश दिलेले आहेत. खानापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. लवकरच पवनऊर्जा प्रकल्पामुळे बाधित शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्यांना आपल्या जमिनी परत मिळविणेसाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया करणेबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून, पवनऊर्जा प्रकल्प न उभा राहिलेल्या सर्व जमिनी मूळ शेतकऱ्यांना परत मिळणेसाठी सर्वतोपरी सहाय्य करणार असलेची माहिती अॅड. मुळीक यांनी दिली.
त्याचबरोबर पवनचक्की कंपनीच्या दलालांमार्फत शेतकऱ्यांच्या विक्री केलेल्या जमिनींचे फेरफार व्यवहार रद्द करून या जमिनी मूळ शेतकऱ्यांना परत द्याव्यात. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीत शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय विद्युत खांब व प्रसारण वाहिन्या उभारण्यात आलेल्या आहेत त्या बाधित शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळावा यासाठी कायदेशीर लढा उभारणार असल्याने पवनऊर्जा प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी संपर्क करण्याचे आवाहन अॅड. बाबासाहेब मुळीक यांनी केले आहे.
