नेचर केअर संस्थेकडून पूरग्रस्तांना दोन लाखांची मदत

विटा, सोलापूर, मराठवाडा आणि विदर्भातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून गुरूवारी विटा येथील नेचर केअर फर्टिलायझर्स आणि बरवा स्किन थेरपीच्या संचालक व कर्मचाऱ्यांच्यावतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रुपये २ लाखाची मदत प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

यावेळी बोलताना प्रांताधिकारी डॉ. बांदल म्हणाले, महाराष्ट्रावर आलेल्या आपत्तीचा सामना करण्यासाठी महापुराप्रमाणेच महाराष्ट्रातील जनतेने मदतीचा महापूर आणावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत नेचर केअर फर्टिलायझर्स व बरवा स्कीन थेरपी तत्काळ मदतीला धावून आली आहे. याचा आदर्श समाजातील इतर व्यक्ती व संस्थांनी घ्यावा. सर्व कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार आणि संचालकांचे मानधन मिळून सदरची दोन लाखाची रक्कम देण्यात आली. यावेळी नेचर केअर फर्टिलायझर्सचे चेअरमन जयंत बर्वे, कार्यकारी संचालक जयदेव बर्वे, सुजीत पाटील, अमृत कुलकर्णी, गिरीश इनामदार उपस्थित होते.