इस्लामपूर, महिला आपल्या कुटुंबाला वेळ देण्यात इतक्या व्यस्त असतात की, त्यांचे आपल्या आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होते. आता महिलांनी शासकीय आरोग्य सुविधा आणि योजनांचा लाभ घेत आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांनी केले. वाळवा तालुक्यातील गावोगावच्या महिलांची(women) कॅन्सर तपासणी करण्यासाठी फिरते पथक उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात स्वस्थ नारी, सशक्त परिवार या अभियानातील महिला (women)आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय कुमार वाघ, उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. नरसिंह देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण पाटील, रुग्ण कल्याण समितीचे सुरेश हवलदार प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी दीप प्रज्वलन व धन्वंतरी प्रतिमा पूजन करण्यात आले.
आ. पाटील म्हणाले,या आरोग्य तपासणी पंधरवड्यात महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार असून त्यातून संपूर्ण कुटुंब सुरक्षित राहू शकते. या शिबिरामध्ये कॅन्सर तपासणीसह २४ हजार आजारांची तपासणी व उपचार केले जाणार आहेत. महिलांनी याचा लाभ घ्यावा. सध्या आरोग्य सुविधा मोठ्या खर्चिक झाल्या आहेत. त्यामुळे सर्व घटकांनी प्रथम शासकीय आरोग्य सुविधा व
योजनांचा लाभ घेण्यास प्राधान्य द्यावे. डॉ. विक्रमसिंह कदम म्हणाले, आम्ही ग्रामीण भागातील रुग्णांना शहराप्रमाणे अद्यावत आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. डॉ. विजयकुमार वाघ म्हणाले, या अभियानातून एकही भगिनी वंचित राहू नये, असा आमचा प्रयत्न आहे. याप्रसंगी डॉ. प्रविण पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी डॉ. नरसिंह देशमुख यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, परेश पाटील, डॉ. प्रज्ञा पाटील, डॉ. रामतीर्थ चौगुले, डॉ. अविनाश पाटील, डॉ. नितीन शहा, डॉ. विनायक कोरे, डॉ. अभिजित खोत, डॉ. शहाजी शेळके यांच्यासह आशा वर्कर्स, नर्सिंग स्कूलचे विद्यार्थी-विद्यार्थिनी महिला उपस्थित होत्या. संदेश सुतार यांनी आभार मानले.
