खानापूर, आटपाडी तालुक्यात मुसळधार पावसाचा धूमाकूळ

विटा,  खानापूर, आटपाडी तालुक्यात शनिवार सकाळपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. सततच्या पावसामुळे नद्या, ओढे-नाले दुथडी भरून वाहत असून अनेक रस्ते व सुमारे २५ पूल पाण्याखाली गेले आहेत. परिणामी खानापूर व आटपाडी तालुक्यातील वाहतूक ठप्प झाली  असून अनेक गावांचा संपर्क  या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आमदार सुहास बाबर आणि खानापूरचे तहसीलदार योगेश्वर टोम्पे तसेच आटपाडीच्या तहसीलदार शितल बंडगर यांनी प्रशासनासह आटपाडी व खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर, घानवड, सांगोले, लेंगरे, करंजे, पळशी आदी गावातील ठिकाणी भेटी दिल्या. पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधत आ. सुहास बाबर यांनी नागरिकांना सावधगिरीचे आवाहन केले. अत्यावश्यक गरजेशिवाय घराबाहेर न पडणे, धोकादायक  घरांमध्ये राहू नये व सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे याबाबत त्यांनी सूचना दिल्या. तसेच पशुधनाची काळजी घेणे, जनावरे ओढ्या-नाल्यांच्या कडेला ठेवू नयेत आणि कोणतीही अडचण आल्यास प्रशासनाला संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार सुहास बाबर व प्रशासनाच्या तत्परतेने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. करंजे येथील  पुलावर पाणीसाठल्याने भिवघाट तासगाव वाहतूक ठप्प झाली होती. प्रशासनाला सूचना देऊन प्रत्यक्ष भेटीदरम्यान जेसीबीच्या सहाय्याने वाहतूक सुरळीत केली. लेंगरे येथील तलावाच्या भिंतीला धोका असून या पाहणी दौऱ्यादरम्यान लेंगरे येथील तलावाच्या सांडव्याखालील दुसरी भिंत खचल्याचे निदर्शनास आले.दरम्यान, आटपाडी तालुक्यातील वलवण येथे पावसामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. स्वाती निलेश जाधव यांच्या गोठ्याची भिंत कोसळून सात शेळ्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच आमदार सुहास बाबर यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.