गणेश पतसंस्थेच्या सुवर्ण महोत्सवाची शनिवारी सांगता 

आष्टा, श्री गणेश नागरी सह. पतसंस्थेने पन्नास वर्षांचा सुवर्णटप्पा पूर्ण केला असून सुवर्ण महोत्सव वर्ष साजरे करीत आहोत, त्याचा सांगता समारंभ शनिवारी ता. ११ ऑक्टोबर रोजी हेव्हन हॉल येथे आम. जयंत पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, वैभव शिंदे, जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे. तरी या कार्यक्रमास सभासद नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन चेअरमन धनपाल चौगुले, व्हाईस चेअरमन गणपती जाधव यांनी पत्रकार परिषदेत केले.

यावेळी सुवर्ण महोत्सव समितीचे स्वागताध्यक्ष उद्योजक नितीन झंवर, रामनारायण उंटवाल, सर्जेराव तांबवेकर, विठ्ठल तळवलकर हे प्रमुख उपस्थित होते. गणपती जाधव म्हणाले, दहा हजार भांडवल व तीन सेवक या स्थितीत सुरू झालेली संस्था आज ५०० कोटी व्यवसायाकडे वाटचाल करीत असून संस्थेचा सध्या सेवक वर्ग ६५ असून संस्थेच्या ठेवी २८० कोटी, कर्जे २०५ कोटी, गुंतवणूक १२१ कोटी, स्वनिधी ५४ कोटी, नेट एनपीए शून्य टक्के असून वसुली कायम ९७ ते ९८ टक्के आहे. संस्थेस चार कोटी ५५ लाख नफा झाला आहे. रामनारायण उंटवाल म्हणाले, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात ११ शाखेच्या माध्यमातून संस्थेने सर्व सामान्य लोकांच्या सेवेचे व गरज पूर्तीचे व्रत्त निस्वार्थीपणे सुरू ठेवले आहे. नितिन झंवर म्हणाले, संस्थेच्या सर्व शाखा संगणकीकृत व कोअर प्रणालीद्वारे अद्यावत आहेत. सर्व शाखातून आरटीजीएस, एन एफटी सुविधा, लॉकर सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत. यावेळी अजिज मुजावर, राजेंद्र मळणगावकर, रामप्रसाद झंवर, दीपक साठे, राजाराम शेळके, दत्तात्रय वारे, अनुराधा झंवर, सुनंदा चिंडक, मॅनेजर बी. व्ही. चौगुले आदी उपस्थित होते.