आष्टा पालिकेची निवडणूक तिरंगी होण्याची चिन्हे

आष्टा नगरपालिके च्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण खुला गटासाठी जाहीर झाले. त्यानंतर प्रभाग रचनेत सात पुरुष, सात महिला असे चोवीस पैकी चौदा जागांवर खुला प्रवर्ग असल्याने शहरात ही निवडणूक ‘खुल्यांसाठी खल’ आहे. यामुळे ‘अपना सपना मनी’ मनी बाळगून असणारे नगराध्यक्ष पदासाठी कमालीचे आतुरले आहेत.

सर्वसाधारण खुल्या गटामुळे अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेले सपनों के सौदागर आता ‘सौद्यात’ दिसत आहेत. ही निवडणूक सत्ताधारी विलासराव शिंदे, आमदार जयंत पाटील गट विरुद्ध भाजपा विरुद्ध अजित पवार राष्ट्रवादी पक्ष अशी तिरंगी होण्याची चिन्हे आहेत. पालिकेची निवडणूक २०१६ मध्ये झाली. आता तब्बल दहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर बहुप्रतिक्षित निवडणूक होत आहे. इच्छुकांना कधी सहा सहा महिने तर कधी वर्ष अशा टप्प्याने निवडणुकीची वाट पहावी लागली. आता ती प्रतीक्षा समाप्त होऊन पालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होत आहे. प्रभाग रचनेनंतर थेट नगराध्यक्ष पद, प्रभाग आरक्षण सोडत झाली. ती खुला सर्वसाधारण गटासाठी असल्याने येथे ‘काटा’ लढत आहे.

नगराध्यक्ष पदासाठी सत्ताधारी विलासराव शिंदे – आमदार जयंत पाटील गटाकडून माजी आमदार विलासराव शिंदे यांचे चिरंजीव विशाल शिंदे, नितीन झंवर, माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील, शैलेश सावंत, तानाजी सूर्यवंशी तर जयंत पाटील गटाकडून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन दिलीपराव वग्यांनी, विराज शिंदे, दत्तात्रय मस्के, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रवीण माने, भाजपाकडून माजी नगरसेवक अमोल पडळकर, लता पडळकर, अनुप वाडेकर, शिवसेनेतून वीर कुदळे, राकेश आटुगडे यांची नावे चर्चेत असून तशा पोस्ट समर्थकांकडून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. १९९६ ते २०१६ या पाच निवडणुका विलासराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकतर्फी झाल्या. येथे विरोधकांना एकही जागा नव्हती. २०१६ च्या निवडणुकीत तीन जागांनी विरोधकांना काहीसा प्रवेश मिळाला. विरोधकांच्या या प्रवेशाने पाच वर्षात सत्ताधाऱ्यांना चांगलाच घाम फोडला. आता शहरात सत्ताधाऱ्यांविरोधात चांगलाच विरोध उभा केला आहे. नगराध्यक्ष पदासाठी तो अधिक गडद आहे. २०२१ पासून सत्ताधारी गटाकडून विशाल शिंदे, अजित पवार गटाकडून प्रवीण माने यांनी जोरदार फील्डिंग लावली आहे. तशी तयारीही दोघांकडून चालू आहे. मात्र आरक्षण स्पर्धेनंतर आता अनेकांच्या उड्या थेटसाठी पडत आहेत. शिंदे गटातूनच झुंजारराव पाटील यांनी दंड थोपटले आहेत. उद्योजक शैलेश सावंत, तानाजी सूर्यवंशी यांनीही चाचपणी सुरू केली आहे. ऐनवेळी नितीन झंवर यांचे नाव पुढे येऊ शकते. जयंत पाटील गटानेही डोकेवर काढले आहे. या गटातील दिलीपराव वग्यांनी, विराज शिंदे, दत्तात्रय मस्के यांना आजअखेर पालिकेत प्रवेश मिळालेला नाही त्यांचे वडील बाळासाहेब वग्यांनी, शंकरराव शिंदे यांनी पालिकेचे नगराध्यक्षपद भूषविले आहेमात्र त्यांच्या वारसांना अद्याप पालिकेत प्रवेशही मिळालेला नाही यामुळे या दोन गटांच्या एकवाक्यतेनंतर सत्ताधाऱ्यांचे चित्र स्पष्ट होईल.

महायुतीत भाजपाने सवता सुभा आखला आहे. तर अजित पवार गटाची स्वतंत्र बांधणी आहे. येथे भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, राहुल महाडिक यांनी लक्ष घातले आहे. भाजपने येथे अमोल पडळकर, अनुप वाडेकर यांची दावेदारी सांगितली आहे. तर निशिकांत पाटील गटाने प्रवीण माने यांची दावेदारी सांगितली आहे. अशातच एकनाथ शिंदे सेना, काँग्रेस, ठाकरे सेनेचे पत्ते ओपन नाहीत. खुल्या गटाच्या आरक्षणाने अपक्षांनीही रान उठवले आहे. एका जागेसाठी सध्या शंभरहून अधिक अपक्ष स्टेटसमधून झळकत आहेत. कोण बाजी मारणार याकडे लक्ष आहे.