संविधानाच्या रक्षणार्थ विट्यात सर्वपक्षीय आंदोलन

विटा ,संविधान न मानणाऱ्या प्रवृत्ती वाढत आहेत. अशावेळी संविधानाचे रक्षक म्हणून आता सर्वसामान्य जनतेने पुढे यावे असे मत सांगली जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष निखिल सुतार यांनी व्यक्त केले.

विटा येथील तहसील कार्यालयासमोर युवक काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय संविधान बचाव आंदोलन करण्यात आले. यात युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निखिल सुतार, शेकापचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड सुभाष पाटील, मनसेचे तालुकाप्रमुख साजिद आगा , सुभाष पाटील , गजानन कांबळे , अतुल भिसे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी सुतार म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीवर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रव्रुतुविरोधात व डॉ. बाबासाहेब आंबेड्करांच्याबाबतीत चुकीच्या प्रकारे अफवा पसरून काही प्रवृत्तीकडून अवहेलना होत होती. अशा प्रवृत्तीविरोधात संबंधित लोकांवर सरकारने कठोरात कठोर कारवाई करावी म्हणून आम्ही सर्व पक्षातील मंडळींनी मिळून आज विटा तहसीलदार यांच्याकडे निवेदन दिले. सध्या एकूणच देशात संविधानाचे भर दिवसा धिंडवडे सुरु आहेत. याविरोधात छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज , म. फुले, बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडणाऱ्या सर्व संविधानप्रेमी मंडळींनी एकत्र येऊन अशा प्रवृत्तीचा निषेध केलाच पाहिजे शिवाय आता देशातील संविधान जपण्याची आणि त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी सर्वसामान्य माणसांच्या हातात आली आहे. त्यामुळे आता संविधानाचे रक्षक म्हणून जनतेने पुढे आले पाहिजे, असेही सुतार यांनी सांगितले. यानंतर तहसीलदार योगेश टोम्पे यांना संयुक्त निवेदन देण्यात आले.