आष्टा-इस्लामपूर पालिकेत भाजपचा नगराध्यक्ष असेल

 आष्टा, केंद्रात – राज्यात – जिल्ह्यात – आष्टा शहरात एकच सरकार असेल तर विकासाला गती येईल. विकासासाठी आत्ताच आष्ट्यासाठी पाच कोटी ८२ लाख तर इस्लामपूरसाठी नऊ कोटी ५१ लाखाचा निधी दिला आहे. भाजपा आष्टा व इस्लामपूर नगरपालिकेची निवडणूक कमळ चिन्हावर लढेल. आष्टा व इस्लामपुरात भाजपाचा नगराध्यक्ष दिसेल, असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

 आष्टा येथे भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन, पक्षप्रवेश व निवडपत्र वाटप, व संवाद मेळावा अशा संयुक्त कार्यक्रमात  मंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, जि. म. बँकेचे संचालक राहुल महाडिक, चिमण डांगे शरद लाड, स्वरूपराव पाटील, अमोल पडळकर, लता पडळकर, नरेंद्र घाटगे, अनुप वाडेकर,कपिल ओसवाल, भीमराव माने, प्रसाद पाटील प्रमुख उपस्थित होते. मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, आगामी तीन महिन्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका होतील. नोव्हेंबर अखेरीस नगरपालिका निवडणुका होतील त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती  त्यानंतर महानगरपालिका निवडणुका होण्याचे संकेत आहेत. आष्टा नगरपालिका जुनी पालिका आहे. येथे स्थानिक आघाड्या होऊन निवडणूक लढतात मात्र यावेळी ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे, चिमण डांगे यांच्यासह अनेकांनी भाजपात प्रवेश केल्याने वाळवा तालुक्यात भाजपाची ताकद वाढली आहे. आष्टा व इस्लामपूर नगरपालिका निवडणूक भाजपा कमळ या चिन्हावर लढवेल.

नगराध्यक्ष पदाचा उमेदवार भाजपचाच असेल राहुल महाडिक म्हणाले, आष्टा व इस्लामपूर पालिकेसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोट्यावधीचा  निधी दिला आहे. अनेक वर्षापासून येथील निवडणुका कमळ चिन्हावर लढल्या नाहीत. वाळवा तालुक्यातील सर्वच निवडणुका कमळ चिन्हावर लढवायचा आदेश द्या. आष्टा, इस्लामपूर पालिकासह वाळवा पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकेल. आष्टा पालिकेत गतवेळी थोडक्या मताने पराभव झाला. यावेळीस नगराध्यक्ष भाजपचाच असेल.
अमोल पडळकर म्हणाले, शहरात भाजपच्या निधीतून अनेक कामे साकारली आहेत. चंद्रकांतदादा आता छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बहुउद्देशीय हॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स औद्योगिक वसाहत, एसटी डेपो हे प्रश्न मार्गी लावावेत. यावेळी भाजपाचे अभिजीत बिरनाळे, सतीश कुलकर्णी, राजकुमार सावळवाडे, संदीप कुडचीकर उपस्थित होते.