वेजेगाव (ता. खानापूर ) येथे बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून लॉकरमधील १ लाख ५७ हजार ५०० रुपयांचे दागिने अनोळखी चोरटयांनी लंपास केले. याबाबतची फिर्याद भगवान नारायण देवकर यांनी विटा पोलिसांत दिली आहे. ही चोरी ४ ते १० ऑक्टोबरदरम्यान घडली.
वेजेगाव येथे कलेढोण रस्त्याकडेला देवकर यांचे घर आहे. ते ४ ते १३ ऑक्टोबरदरम्यान मुंबई येथे मुलांकडे गेले होते. यादरम्यान चोरटयांनी त्यांच्या घरातून ३५ ग्रॅम वजनाचे १ लाख ५ हजाराचे सोन्याचे मंगळसूत्र , १५ हजाराचे पाच ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र , ३७ हजार ५०० रुपयांचा साडेबारा ग्रॅमचा सोन्याचा लक्ष्मीहार असा १ लाख ५७ हजाराचा ऐवज चोरून नेला. देवकर यांच्या शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा उघडा असल्याचे फोनवरून सांगितले. त्यांनी वेजेगाव येथे येऊन पहिले असता घरात चोरी झाल्याचे दिसून आले.
