राजेवाडी कारखान्यात ग्रामस्थांकडून तोडफोड

आटपाडी , राजेवाडी (ता. आटपाडी ) येथे बुधवारी रात्री सद्गुरू श्री श्री साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी व खासगी सुरक्षा रक्षकांनी गणेश पुजारी या तरुणास बेदम मारहाण केली. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी कारखान्यावर धाव घेत तोडफोड केली. या तोडफोडीत अंदाजे एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष शेषगिरी राव यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार , गणेश पुजारी हे आपल्या सहकाऱ्याला ऍडव्हान्स पाहिजे असल्याने त्याच्यासोबत कारखान्याच्या गेटवर गेले होते. यावेळी पूर्वीच्या वादातून कारखान्यातील कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांनी त्यांच्यावर हल्ला केला. या मारहाणीत गणेश पुजारी गंभीर जखमी झाले. त्यांना सांगलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गावात मारहाणीची बातमी समजताच संतप्त ग्रामस्थांनी कारखान्याकडे धाव घेतली. कार्यालयावर हल्लाबोल केला. कार्यालयातील संगणक , प्रिंटर , मॉनिटर, वायरिंग,केबिन,फर्निचर आणि वे- ब्रिज यंत्रणेची तोडफोड केली. त्यामुळे कारखान्याचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर जमाव पांगला. या घटनेमुळे राजेवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री उशिरापर्यंत याबाबत पोलिसात नोंद नव्हती .