मध्यवर्ती बसस्थानक प्रवाशांनी हाऊसफुल्ल ;सुट्टी संपल्याने परतीसाठी गर्दी

 
इचलकरंजी, दिवाळीची सुट्टी संपल्याने अनेकजण आपापल्या गावी परतताना दिसत आहेत. यामुळे रविवारी सकाळपासूनच इचलकरंजी मध्यवर्ती बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून आली. दीपावलीच्या काळात शाळा, महाविद्यालये तसेच उद्योग जगतातही काही काळ सुट्टीमुळे बंद असतात. यामुळे विद्यार्थी वर्गासह कामगार, महिला आपल्या गावी जातात. यावेळी एसटीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास मानला जातो. यामुळे दीपावलीच्या काळात तसेच दीपावली संपल्यानंतरही एसटीला मोठी गर्दी असल्याचे दिसून येत आहे. आठवडा दीड आठवड्याच्या सुट्टीनंतर शाळा, महाविद्यालये तसेच कारखाने सुरू होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह कामगार परतत आहेत.

लांब पल्ल्याच्या एसटी बसेस वेळेवर सोडण्यात येत असल्याने अनेक नागरिकांनी आधीच आरक्षण केल्याचे दिसून येत होते. येथील मध्यवर्ती बस स्थानकातही रविवारी प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसून आली. इचलकरंजी, जयसिंगपूर, कोल्हापूर, सांगली यासह ग्रामीण भागांत जाणाऱ्या फलाटवर महिला भगिनींसह नागरिकांची दिवसभर गर्दी उसळली होती. यामुळे एसटी बस स्थानकातील कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ होत असल्याचे दिसून आले. गेल्या आठवडाभरापासून एसटीला अधिकच गर्दी दिसून येत असल्याने महामंडळाच्या उत्पन्नात चांगलीच भर पडली असल्याचे दिसून येते.