चौपट भरपाईशिवाय जमिनीची मोजणी नाही

 
हातकणंगले,  रत्नागिरी – नागपूर राष्ट्रीय महामार्गात जमिनी जाणाऱ्या चोकाक ते अंकली दरम्यानच्या शेतकऱ्यांना चौपट भरपाई देण्याचा अधिकृत जीआर शासन काढत नाही तो पर्यंत जमिनीची मोजणी करू देणार नाही अशी मागणी करत राष्ट्रीय महामार्ग अन्याय निवारण कृती समितीच्या कार्यकर्त्यांकडून सोमवारी हातकणंगले भुमि अभिलेख कार्यालयाच्या दारात ठिय्या आंदोलन करून शासनाच्या या कृतीचा जाहिर निषेध करण्यात  आला.

 चोकाक ते मजले दरम्यानच्या पाच गावातील शेतकऱ्यांना ऐन दिवाळी सणाच्या सुट्टीच्या काळात नोटीसा देऊन सोमवारी जमिनीची मोजणी ड्रोनद्वारे केली जात होती याची माहिती संबंधीत शेतकऱ्यांच्या राष्ट्रीय महामार्ग अन्याय निवारण कृती समितीच्या कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी या मोजणीस विरोध करत भुमि अभिलेख कार्यालयाच्या दारातच ठिय्या मारत आंदोलन चालु केले.

यावेळी कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील, डॉ. अभिजीत इंगवले, सुरेश खोत, किरण जामदार, अमित पाटील, दिपक वाडकर, अविनाश कोडोले, सुधाकर पाटील, मिलींद चौगुले, प्रतिक मुसळे, शिलवंत बिडकर, आनंदा पाटील, जयकुमार दुधे आदी शेतकरी उपस्थित होते.