कुंभोज जि. प. मतदार संघात राजकीय घडामोडींना वेग

कुंभोज,  कुंभोज (ता. हातकणंगले) जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर कुंभोज मतदारसंघात राजकीय समीकरणांचे तारे पुन्हा गुंतले आहेत. मतदारसंघ सर्वसाधारण महिलांसाठी खुला झाल्याने यावेळी ‘सौभाग्यवतींच्या ‘ उमेदवारीवर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. गावागावात, चौकाचौकात आणि सोशल मीडियावर निवडणुकीच्या चर्चांना उधाण आले असून, कुंभोजचे राजकीय पारडं कोणाच्या बाजूने झुकेल याबाबत तर्कवितर्कांचा पाऊस सुरू आहे.

 २०१७ मध्ये २५ हजार ६६७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यावेळी शिवसेनेचे प्रविण यादव यांनी ८५९५ मतं मिळवत विजय मिळवला, तर जनसुराज्यच्या अमोल गावडे यांनी ६८३४ मतं मिळवली होती. तसेच कॉंग्रेसचे किरण माळी, स्वाभिमानीचे संतोष शिंदे यांनीही चांगली लढत दिली होती. यावेळी मात्र मैदान वेगळं आहे.राजकीय चर्चेनुसार, भाजप, जनसुराज्य शक्ती पक्ष, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे चारही पक्ष मिळून महायुतीच्या नावाने एकत्रित उमेदवार देणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्रित लढत देणार का, याचाही निर्णय अजून नेत्यांनी गुलदस्त्यात ठेवला आहे.

 दरम्यान, या निवडणुकीत पैसा, पद आणि प्रतिष्ठा या तिन्ही गोष्टींचा कस लागणार असल्याचे राजकीय जाणकार सांगतात. ‘आमचा नेता लय पॉवरफुल!’ असे म्हणणारे कार्यकर्ते आपल्या पक्षाचा झेंडा उंचावण्यासाठी सज्ज झाले आहेत.

 गावागावात सध्या राजकीय विश्लेषकांची व पारावरच्या नेत्यांची गर्दी वाढली असून, कोण कोणाशी हातमिळवणी करणार आणि कोण कुणाला टक्कर देणार, यावर चर्चेचे वारे वाहत आहेत. सोशल मीडियावर संभाव्य महिला उमेदवारांच्या पोस्ट्नी रंगत आणली असून, सर्वांचे लक्ष आता पक्षश्रेष्ठींच्या अंतिम निर्णयाकडे लागले आहे.

 एकूणच, कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले असून, पुढील काही दिवसांत ‘महायुती विरुद्ध महाविकास आघाडी’ अशी थरारक लढत रंगण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.