आष्टा नगरपालिका निवडणुकीसाठी थेट नगराध्यक्ष पदासह प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाले आहे. नुकतीच मतदार यादी अंतिम झाली आहे. यामुळे शहरात निवडणुकीचा माहोल तयार झाला आहे. थेट नगराध्यक्षपद हे ‘सर्वसाधारण खुल्ले’ असल्याने येथे थेट साठी जोरदार चुरस होणार आहे. १२ प्रभागातून २४ जणांना संधी मिळणार आहे. येथे सत्ताधारी स्वर्गीय विलासराव शिंदे गट ( व आमदार जयंत पाटील गट एकत्रित लढण्याची चिन्हे आहेत मात्र त्यांच्यात जागा वाटपावरून नाराजी नाट्य रंगण्याची शक्यता आहे. थेट नगराध्यक्ष पदाकरिता विलासराव शिंदे गटाकडून गटनेते विशाल शिंदे, माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील, उद्योजक नितीन झंवर, शैलेश सावंत, तानाजीराव सूर्यवंशी हे इच्छुक आहेत तर जयंत पाटील गटाकडून दिलीपराव वग्यानी, विराज शिंदे, किरण काळोखे, अमित ढोले, भगवान बोते, माणिक शेळके, अर्जुन माने, दत्तात्रय
मस्के, बंडा टकले इच्छुक आहेत. भाजपाकडून माजी नगरसेवक अमोल पडळकर, संग्राम शिंदे, अनुप वाडेकर, अभिजीत बिरनाळे, शिवसेनेकडून बंडा आटूगडे, काँग्रेसकडून राहुल थोटे, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून एकमेव प्रवीण माने हे इच्छुक आहेत. काहींनी प्रचार सुरूही केला आहे.
सत्ताधारी शिंदे व पाटील गटाकडून प्रभागनिहाय उमेदवारी चाचणी सुरू आहे. याकरिता उमेदवारांसोबत दोन दिवसापासून बैठका सुरू आहेत. शिंदे गटाकडून वैभव शिंदे, झुंजार पाटील, तानाजीराव सूर्यवंशी, प्रकाश रोकडे, नितीन झंवर हे उमेदवारांची मुलाखती घेत आहेत. या गटाकडे २४ जागांसाठी ५५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. जयंत पाटील गटाकडे उमेदवारीसाठी भाऊगर्दी आहे. स्वतः जयंत पाटील यांनी उपस्थित राहून इच्छुकांना मार्गदर्शन केले आहे. रघुनाथ जाधव, संग्राम फडतरे, रामचंद्र सिद्ध, विराज शिंदे, दिलीप वग्यानी हे मुलाखती घेत आहेत. या गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी सात तर शंभरहून अधिक जणांनी नगरसेवक पदासाठी मागणी केली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून २७ महिला व ३० पुरुषांनी उमेदवारी मागणी केली आहे. महायुतीतील अजित पवार राष्ट्रवादी वगळता सर्व राजकीय पक्षातील नेत्यांनी एकत्रित येत सर्व जागा लढवण्याची तयारी केली आहे. सत्ताधारी व विरोधकांच्या कार्यशैलीला वैतागलेल्या काही जणांनी अपक्षाचा नारा देत प्रचाराला सुरुवात केली आहे. जनता मात्र या टप्प्यावर कोणालाही अंदाज देण्याच्या मानसिकतेत नाही. असे असले तरी इच्छुक उमेदवारांनी जनतेला गृहीत धरीत आपल्या उमेदवारीसाठी समर्थकांसह नेतेमंडळींना भेटायला सुरुवात केली आहे. त्यामुळे उमेदवारांच्या भाऊगर्दीत समर्थकांची खाऊगर्दी दिसू लागली आहे.
