महाराष्ट्रातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली असताना सांगली जिल्ह्यातील आष्टा शहरात एक विचित्र आणि धक्कादायक घटना घडली आहे.
मतदानाच्या अवघ्या काही तासांपूर्वी शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यावर भंडारा आणि लिंबू टाकलेले आढळून आले. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि खळबळ पसरली असून, यामागे एका उमेदवाराचा हात असल्याची चर्चा शहरात जोर धरत आहे.
पुरोगामी विचारासाठी ओळखल्या जाणाऱ्या सांगलीत अशा प्रकारचे भानामतीसारखे प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आष्टा नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यानच हा प्रकार समोर आल्यानंतर शहरात राजकीय वातावरण आणखी तापले आहे. मतदानापूर्वी मतदारांच्या मनावर परिणाम करण्यासाठी हा प्रयत्न तर नाही ना, अशीही चर्चा विविध भागांत रंगली आहे. या पार्श्वभूमीवर सांगलीतील दोन नगरपंचायतींसाठी व आठ नगरपरिषदांसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. आठ नगराध्यक्ष पदांसाठी 41 उमेदवार आणि 180 नगरसेवक पदांसाठी तब्बल 590 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यातील 2 लाख 58 हजार मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
मतदान सुरळीत पार पडावे यासाठी 291 मतदान केंद्रांवर 1 हजार 780 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच ईश्वरपूर, तासगाव आणि जत ही संवेदनशील केंद्रे मानून पोलिसांचा मोठा बंदोबस्त उभारण्यात आला आहे. आष्टा, विटा, पलूस-शिराळा आणि आटपाडी नगरपंचायतींसाठीही आजच मतदान होत आहे. एकीकडे मतदान प्रक्रिया सुरू असताना, दुसरीकडे आष्टा शहरात घडलेल्या भानामतीसारख्या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेवर संशयाची छाया निर्माण झाली आहे. प्रशासनाने या प्रकरणाची नोंद घेत तपास सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
