मुख्यमंत्री फडणवीसांकडे सांगली जागा वाटपाचा निर्णय ; आज मुंबईत होणार बैठक

सांगलीत झालेल्या बैठकांमध्ये भाजप नेत्यांचे जागा बाटून घेण्यावरून एकमत होत नाही हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारात हा विषय पोहोचला आहे.

गुरूवारी याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेणार असून स्थानिक नावे आणि मुख्यमंत्र्यांचा विशेष सर्व्हे पडताळून त्यांच्याकडून अंतिम निर्णय दिला जाण्याची शक्यता आहे. मात्र उमेदवारांची घोषणेबाबत साशंकताच आहे.

भाजपला सर्वाधिक जागा मिळणार हे स्पष्ट आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढेल. शिंदे सेनेने १५ जागांची मागणी केली आहे. तितक्याच जागा जनसुराज्य शक्ती पनाने मागितल्या असून दोन जागा रिपाइंलादेण्याचा प्रस्ताव आहे. त्यातील एक हक्काचा उमेदवारच अजित पवार राष्ट्रवादीत गेल्याने आता केवळ सांगलीतील एका जागेचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

बुधवारी शिंदे शिवसेनेसोबत पालकमंत्री पाटील यांनी पुण्यात चर्चा केली. याला आ. सुहास बाबर आणि आ. राजेश क्षीरसागर यांची उपस्थिती होती, असे समजते. मात्र त्यांच्या मागणीवर निर्णय झाला नाही. विशेष करून मोहन व्हनखंडे यांच्या पुत्र आणि पत्नीच्या उमेदवारीला आ. खाडे यांनी विरोध केला असल्याने पेच निर्माण झाला आहे.

मंगळवारी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी निवडणूक समितीबरोबरच कोर कमिटीच्या सदस्यांची बैठक घेऊन त्यांच्यापुढे सर्व्हेची चर्चा केली. आपल्याकडे दोन, दोन प्रभागांची जबाबदारी मागणाऱ्या महत्वाकांक्षीमाजी नगरसेवकांना एक पूर्ण प्रभागही मिळणार नाही तर काहींना केवळ एक जागा दिली जाईल असे सांगितल्याने त्यांना धक्का बसला आहे. माजी स्थायी सभपती सुरेश आवटी, दिलीप सूर्यवंशी यांनाही अपेक्षेइतक्या जागा मिळणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आल्याचे समजते.

जयश्रीताई पाटील यांनाही अपेक्षित जागा देण्यावरून वाद असून पृथ्वीराज पाटील यांचा आग्रह असणाऱ्या उमेदवारांच्या बाबतही फारशा गांभिर्याने विचार झाला नाही. प्रभाग ९ मध्ये जयश्रीताई पाटील यांचे खंदे समर्थक संतोष पाटील यांना आ. गाडगीळ यांचा विरोध असून तेथे अतुल माने यांच्यासह पॅ नेलच्या अन्य सदस्यांसाठी त्यांचा दबाब आहे. विश्रामबागमधील काही महिला उमेदवारांसह विद्यमान नगरसेवकांनाही असाच विरोध झालाअसून सांगली गावभाग, विश्रामबाग, मिरज ब्राह्मणपुरीतील उमेदवारी बादाचा मुद्दा ठरल्या आहेत. जुन्या मंडळींनीही काही जागांवर आग्रह धरला असून निवडणूक प्रमुख, प्रभारी यांच्याशी चर्चा करण्यास दोन्ही आमदार तयार नाहीत.

या पार्श्वभूमीवर आता बाद संपुष्टात आणण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होणार असून त्याला दोन्ही आमदार, शेखर इनामदार, प्रकाश ढंग आणि दिनकर तात्या पाटील हे पदाधिकारी उपस्थित असतील. जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, शिंदेसेनेचे आ. सुहास बाबर यांच्याशी मुख्यमंत्र्यांचे असलेले अनिष्ट संबंध लक्षात घेता त्यांच्या जागांसह जयश्रीताईसाठीही फडणवीसांचाच शब्द अंतिम ठरेल.