आटपाडी अतिवृष्टीचा फटका, पण दरात गोडी; डाळिंबाने गाठला ६३० रुपयांचा ऐतिहासिक टप्पा

यंदा डाळिंब बागांना निसर्गाच्या लहरीपणासह अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. परिणामी, डाळिंबाची आवक घटली आहे. पुरवठा कमी आणि मागणी जास्त असल्याने डाळिंब दराच्या ‘गोडी’त विक्रमी वाढ झाली आहे.

डाळिंबाच्या दराने इतिहासातील उच्चांक गाठला असून शेतकऱ्यांसाठी ही दरवाढ दिलासादायक ठरत आहे.

पुणे येथील गुलटेकडी बाजार समितीच्या सौदे बाजारात, संजय अनपट यांच्या अडतीवर सांगोला तालुक्यातील नवनाथ बजबळकर यांच्या डाळिंबाला पहिल्या राशीला विक्रमी ६३०, तर एकूण सरासरी ३५२ रुपये प्रतिकिलो भाव मिळाला, तर बागेत २२५ ते २६० रुपये प्रति किलो असे दर सध्या मिळत आहेत. गेल्या दोन दिवसांत दरात प्रतिकिलो ४० ते ६० रुपयांची वाढ झाली आहे.

सध्या व्यापाऱ्यांकडून डाळिंब बागांचा शोध घेऊन खरेदी जोरात सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांच्या बागेत सरासरी २२५ रुपये प्रतिकिलो दराने व्यवहार चार दिवसांपूर्वी सुरू होते. जुलैमध्ये हंगाम धरलेल्या बागांतील डाळिंब आता विक्रीसाठी उपलब्ध झाले असले, तरी अशा बागांची संख्या कमी आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेतच डाळिंबाचा तुटवडा भासत आहे.

पुणे मार्केटमध्ये नवा उच्चांक

पुणे येथील गुलटेकडी बाजार समितीत गेल्या आठवड्यापासून डाळिंबाच्या दरात रोज वाढ होत आहे. येथील संजय अनपट यांच्या लिलाव पेढीवर नाना बंडगर यांनी घेतलेल्या लिलावात सांगोला तालुक्यातील शेतकरी नवनाथ बजबळकर यांच्या डाळिंबाला अभूतपूर्व भाव मिळाला.

लिलावात सरासरी ३५२ रुपये उच्चांकी दर मिळाल्याने हा चर्चेचा विषय ठरला. एक जानेवारीस याच शेतकऱ्यांच्या डाळिंबाला सरासरी ३०० रुपये दर मिळाला होता; त्यात तब्बल ५० रुपयांची वाढ झाली. आटपाडीतील प्रगतशील शेतकरी विजय मरगळे यांच्या डाळिंबाला पंधरा दिवसांपूर्वी विक्रमी २५१ रुपये दर मिळाला होता. सध्या यात आणखी वाढ झाली आहे.

…असा मिळाला भाव

पहिली रास ……. ६३० रुपये प्रति किलो

दुसरी रास……… ४०५ रुपये प्रति किलो

तिसरी रास …… ३५४ रुपये प्रति किलो

चौथी रास ……. ३३० रुपये प्रति किलो

पाचवी रास…….२९३ रुपये प्रति किलो दर का वाढले?

बेसुमार पावसामुळे डाळिंबाचे उत्पादन, फुगवण आणि गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम झाला. अनेक ठिकाणी बागांचे नुकसान झाल्याने डाळिंबाची कमतरता निर्माण झाली आहे. सणासुदीचे दिवस, तसेच आरोग्यदायी फळ म्हणून वाढलेली मागणी यामुळे दरात मोठी वाढ दिसून येत आहे. डाळिंबाच्या दरातील या ‘गोडी’मुळे नुकसान सोसणाऱ्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळत आहे.