आधी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा, मग निवडणुका जाहीर करा; अन्यथा…

आज लोकसभेच्या निवडणुकांचा (Loksabha Election) कार्यक्रम जाहीर होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये किती टप्प्यात, कोणत्या तारखेला मतदान होणार याबाबतची माहिती मिळणार आहे. दरम्यान, निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिलाय. आधी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा,सगेसोयरेची अंमलबजावणी करा, मग निवडणुका जाहीर करा, अन्यथा मराठा समाजाची लाट सरकारला परवडणार नाही असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय. 

निवडणूक आयोग आज लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार पण त्या आधीच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिलाय. सगेसोयरेची अंमलबजावणी न करता निवडणूक कार्यक्रम जाहीर करु नका असे जरांगे पाटील म्हणालेत. सरकारला आधी सावध करणार नाही, आचारसंहिता लागू झाल्यानंतर आमची भूमिका मांडणार असल्याचे पाटील म्हणाले. सत्ताधारांच्या अंगाला गुलाल लागू देणार नाही. यांचा जीव सत्तेत आहे. त्यामुळं त्यांना सत्ताच मिळू देणार नाही,  मराठा समाज टोकाचा निर्णय घेणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. 

ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण न देता आचारसंहिता लागू केली तर मराठा समाजाची सभा घेणार आहे. निवडणूक लागतच सभेची तारीख जाहीर करणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेआधी जरांगे पाटील एबीपी माझाशी बोलत होते. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली. 900 एकरमध्ये 6 कोटी समाज बांधवांची सभा घेणार आहे. मुबंई, पुण्यासह अमरावती सोलापूर, बीड, उस्मानाबाद , आशा 11 ठिकाणच्या जागांचा पर्याय आहे. यापैकी एक जागा अंतिम करणार
असल्याचं जरांगे पाटलांनी सांगितलं.