दहावी बोर्डाच्या परीक्षा 1 मार्च रोजी सुरू झाल्या असून येत्या दिवसांत म्हणजेच 22 मार्च रोजी संपणार आहेत. पण त्या आधाची विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 18 मार्च रोजी झालेल्या विज्ञान – 1 या विषयात विद्यार्थ्यांना 2 अतिरिक्त गुण मिळण्याची शक्यता आहे.आमदार कपिल पाटील दहावीच्या विज्ञान 1 विषयाच्या बोर्डाच्या पेपरमधील संदिग्ध प्रश्नाच्या दोन्ही उत्तरांना गुण देण्याची मागणी केली आहे. त्यांनी यासंदर्भात शिक्षणमंत्री आणि बोर्डाला पत्र लिहिलं आहे.
त्यामुळे कपिल पाटील यांची मागणी मान्य झाली तर विद्यार्थ्यांना अतिरिक्त 2 गुण मिळतील. कपिल पाटील यांनी पत्रात म्हटले की, दिनांक 18 मार्च रोजी इयत्ता दहावीचा विज्ञान – 1 या विषयाचा बोर्डाचा पेपर झाला. यात प्रश्न 1 (B) मधील i क्रमांकाच्या ‘सर्वात लहान आकाराच्या अणूचे नाव लिहा’ या प्रश्नाच्या उत्तराबाबत विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात संदिग्धता निर्माण झाली आहे.
अनेक पालकांनी याबाबत माझ्याकडे चिंता व्यक्त केली आहे. वैज्ञानिकदृष्ट्या विचार करता त्याचे अचूक उत्तर ‘हायड्रोजन’ हे आहे. मात्र काही शाळांमध्ये याचे उत्तर ‘हेलियम’ असल्याचे तर काही शाळांमध्ये योग्य उत्तर ‘हायड्रोजन’ असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाल्याचे कपिल पाटील यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.