पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा! सभेवर पावसाचे सावट, महायुतीकडून जोरदार बॅनरबाजी

 महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. यंदा विधानसभेत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत होणार आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या (२६ सप्टेंबर) पुणे दौऱ्यावर येणार आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते भुयारी मेट्रोचे उद्धाटन केले जाणार आहे. तर स्वारगेट ते कात्रज या नव्या मेट्रो मार्गाचे भूमीपूजन मोदींच्या हस्ते होणार आहे.

या निमित्ताने पुण्यात जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या संध्याकाळी 5.35 च्या दरम्यान पुणे विमानतळावर दाखल होती. त्यानतंर ते साधारण 5.55 च्या सुमारास पुणे विमानतळावरुन मोदी शिवाजीनगर येथील मेट्रो स्टेशनला पोहोचतील. यानंतर ते शिवाजीनगर मेट्रो स्टेशन येथून शिवाजीनगर ते स्वारगेट पर्यंतच्या भुयारी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील. तसेच मेट्रोने प्रवास करत मोदी स्वारगेटला पोहोचतील.

यानंतर स्वारगेट येथून स्वारगेट ते कात्रज या नव्या मेट्रो मार्गाचे भूमीपूजन मोदींच्या हस्ते करण्यात येईल. तसेच स्वारगेटवरुन 6.30 वाजता मोदी एसपी कॉलेज येथे सभास्थळी पोहचतील. यानंतर रात्री 7.55 मिनिटांनी मोदी पुणे विमानतळाहून दिल्लीला रवाना होतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवर पावसाचे सावट पाहायला मिळत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस सक्रीय झाला आहे.

त्यामुळे हवामान विभागाने 27 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पुण्यातील एस.पी.कॉलेजच्या मैदानावर होणार आहे. या मैदानावर जय्यत तयारीही सुरु आहे.