एकीकडे महाराष्ट्रातील काही भागांना ऑक्टोबर हिटचा तडाखा बसत असून, उष्णता वाढली आहे. तर दुसरीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज हवामान विभागाकडून पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसाची शक्यता आहे.राज्यात परतीचा पाऊस सुरूच आहे. याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसत असल्याचं दिसून येत आहे. मात्र आणखी चार दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज मुंबई आणि उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसांच्या सरींची शक्यता आहे, तसेच पुढील 24 तास ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.
दुसरीकडे कोकणात देखील हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, पालघर या जिल्ह्यांसह काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे.मध्य महाराष्ट्रातही जोरदार पावसाचा अंदाज आहे, सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.मराठवाडा आणि विदर्भातही आज जोरदार पावसाची शक्यता आहे, बीड, हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाचा अंदाज आहे.दरम्यान एकीकडे मुसळधार पाऊस तर दुसरीकडे राज्यातील काही भागांमध्ये सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट असं दुहेरी संकट असणार आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.