फेंगल चक्रीवादळानंतर राज्यातील वातावरणात बदल होत आहे. कधी थंडी तर कधी आभाळ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील काही भागांत पाऊस पडत आहे. आता कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस राज्यावर पावसाचे सावट असून काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
दुसरीकडे राज्यात असलेला थंडीचा जोर कमी झाला आहे.पुढील ४८ तासांत कोकण गोव्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर तर मराठवाड्यातील संभाजीनगर, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडतील. यावेळी वाऱ्यांचा वेग ताशी ३० ते ४० एवढा असेल.