उद्धव ठाकरे राज यांच्या कानात असे काय बोलले? राज ठाकरे यांना हसू अवरेना…

राज्यातील राजकारणात ठाकरे परिवाराची चर्चा नेहमीच होत असते. बाळासाहेब ठाकरे असताना राज यांनी शिवसेना सोडली. त्यानंतर राज आणि उद्धव या चुलत्यांमध्ये दुरावा निर्माण झाला. हे दोन्ही भाऊ रविवारी मुंबईत कुटुंबातील लग्नामुळे एकत्र आले. त्यावेळी त्यांच्यात चर्चाही झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या कानात काही सांगितले. त्यानंतर राज ठाकरे यांना हसू अवरेना. त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची बहीण जयवंती ठाकरे-देशपांडे यांच्या मुलाचे आज लग्न झाले. दादरमधील राजे शिवाजी विद्यालयात हे लग्न लागले. या लग्नाच्या निमित्ताने ठाकरे कुटुंब एकत्र आले. दोन्ही ठाकरे बंधूंनी शेजारी-शेजारी उभे राहून वधू-वरांना आशीर्वाद दिले. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चाही झाली. दोन्ही भावांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, त्याचा तपशील समजू शकलेला नाही. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेला आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनाला चांगलाच फटका बसला. या निवडणुकीत राज ठाकरे यांचा एकही आमदार निवडून आला नाही. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचे केवळ २० आमदार निवडून आले.

विधानसभा निवडणुकीत मनसे आणि ठाकरे सेनेला बसलेल्या या फटक्यानंतर हे दोन नेते एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली. आता मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. ठाकरे बंधूंसाठी मुंबई मनपावर सत्ता मिळवणे महत्वाचे आहे. त्या निवडणुकीच्या आधी काही सूत्रे बदलतील का? राज आणि उद्धव एकत्र येणार का? या चर्चा सुरु झाल्या आहेत. राज आणि उद्धव कौटुंबिक कार्यक्रमात यापूर्वी एकत्र आले होते. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांचे सुपुत्र शौनक पाटणकर यांचा विवाह सोहळ्यात राज आणि उद्धव एकत्र आले होते. परंतु त्यावेळी दोन्ही भावांची भेट झाली नव्हती.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना त्यांच्यासोबतच राज ठाकरे यांनी त्यांची राजकीय कारकीर्द सुरु केली होती. उद्धव ठाकरे त्यावेळी राजकारणात नव्हते. परंतु उद्धव ठाकरे राजकारणात आल्यानंतर शिवसेनेत मतभेद सुरु झाले. त्यानंतर राज ठाकरे शिवसेना सोडली आणि त्यांचा नवीन पक्ष स्थापन केला. महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाच्या माध्यमातून राज ठाकरे राजकारण करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून सत्ताकारणात आहे.