मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या विट्यातील कार्यक्रमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमितजी शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम पत्रिकेत बदल करण्यात आलेला आहे. टेंभू योजनेच्या ६ व्या टप्याचे भूमिपूजन व शेतकरी मेळाव्याचा पूर्वनियोजित कार्यक्रम २ ऑक्टोबरऐवजी उद्या मंगळवारी एक ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता होणार आहे. शेतकरी, कार्यकर्त्यांनी या बदलाची नोंद घ्यावी तसेच हा कार्यक्रम विट्याच्या महात्मा गांधी विद्यामंदिरच्या मैदानावर होणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर यांनी दिली आहे.
विट्यातील महात्मा गांधी शाळेच्या मैदानावर बाबर गटाकडून जंगी नियोजन करण्यात आले आहे. टेंभू योजनेच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी स्व. आमदार अनिलभाऊ बाबर यांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले. टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याचे काम मार्गी लागून वर्कऑर्डर निघाली आहे. १ ऑक्टोबर रोजी सहाव्या टप्प्याच्या सुळेवाडी येथील कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्य मंत्री अजित पवार, मंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, भाजपचे चंद्रकांत पाटील यांच्यासह महायुतीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत होत आहे.
या कार्यक्रमासाठी सुमारे वीस हजार लोकांची बैठक व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाबर गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे.