अमिताभ बच्चन गेल्या 25 वर्षांपासून ‘कौन बनेगा करोडपती’ सोबत जोडलेले आहेत. वयाच्या 57 व्या वर्षी, बॉलिवूड सुपरस्टारने या रिअॅलिटी शोसह त्याच्या कारकिर्दीची दुसरी इनिंग सुरू केली. या शोने बराच काळ प्रचंड टीआरपी मिळवला होता. पण आता ओटीटीची वाढती क्रेझ आणि सोनी टीव्हीची कमी होत चाललेली लोकप्रियता यामुळे या शोचे रेटिंग दिवसेंदिवस कमी होत आहे. असे ऐकायला मिळतं आहे की केबीसीचे निर्माते अमिताभ बच्चन यांच्या जागी दुसरा व्यक्तीचा विचार करत आहेत. अमिताभ बच्चन यांच्यावरील रेटिंग्जचा दबाव वाढल्याचंही म्हटलं जात आहे. एक वर्षापूर्वी स्वतः अमिताभ बच्चन यांनी हा शो सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण अमिताभ बच्चन यांची जागा घेणे खरंच एवढं सोपं आहे का? शाहरुख खान खरोखरंच पुन्हा एकदा बिग बी आणि होस्ट केबीसीची जागा घेणार का? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.
शाहरुख खान किंवा महेंद्रसिंग धोनी करणार ‘कौन बनेगा करोडपती’ च्या पुढील सीझनचे सूत्रसंचालन?
मीडिया रिपोर्ट्सनुसार अमिताभ बच्चनऐवजी शाहरुख खान किंवा महेंद्रसिंग धोनी ‘कौन बनेगा करोडपती’च्या पुढील सीझनचे सूत्रसंचालन करू शकतात असं म्हटलं जात आहे. खरंतर,2007 मध्ये अमिताभ बच्चन यांच्या अनुपस्थितीत शाहरुख खानने ‘कौन बनेगा करोडपती’चे होस्टींग केले होते. पण टीआरपीच्या शर्यतीत या शोचा मोठा पराभव झाला. त्यानंतर 3 वर्षांच्या दीर्घ विश्रांतीनंतर, हा शो पुन्हा एकदा अमिताभ बच्चन यांच्यासह परतला. आता सोनी टीव्हीच्या रँकिंग आणि शोच्या घसरत्या रेटिंगमध्ये शाहरुख खान या शोला हो म्हणतो की नाही हे पाहणे मनोरंजक ठरेल. पण सध्या निर्मात्यांची पहिली पसंती शाहरुख खानच असल्याचं म्हटलं जात आहे.
ऐश्वर्या राय बच्चनच्या नावाचीही चर्चा
शाहरुख व्यतिरिक्त ऐश्वर्या राय बच्चन आणि महेंद्रसिंग धोनी यांच्याही नावाची चर्चा आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या नावांव्यतिरिक्त, ‘कौन बनेगा करोडपती’ची टीम इंडस्ट्रीतील अशा सेलिब्रिटींच्या नावांचा विचार करत आहे, जे त्यांच्या अनुभवाच्या आधारे प्रेक्षकांशी कनेक्ट होऊ शकतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे स्पर्धकांशी चांगले संवाद साधू शकतात. अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान ज्या पद्धतीने प्रेक्षकांशी जोडले जाऊ शकतात त्यानुसार ऐश्वर्या राय बच्चन आणि महेंद्रसिंग धोनीच्या नावाचा विचार केला जाणार नाही असंच काहीस दिसून येत आहे.
सेटवरील वातावरण आता अमिताभ बच्चन यांच्यासाठी पूर्वीसारखे राहिलेले नाही
खरं तर, अनेक मोठे ब्रँड या शोसोबत, अमिताभ बच्चन यांच्या नावाशी जोडले जातात . माहितीनुसार, कमी रेटिंग असूनही, हा शो दरवर्षी कोट्यवधींचा व्यवसाय करतो फक्त अमिताभ बच्चन यांच्या नावामुळे आणि म्हणूनच ‘कौन बनेगा करोडपती’साठी अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा चांगला पर्याय कोणीही असू शकत नाही. पण अलीकडेच सोनी टीव्हीच्या प्रोग्रामिंग टीममध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.
या बदलांमुळे, शोच्या सेटवरील वातावरण आता अमिताभ बच्चन यांच्यासाठी पूर्वीसारखे राहिलेले नसल्याचं बोललं जातं. तसेच सीआयडी सारख्या कमी बजेटच्या शोनेही रेटिंगच्या बाबतीत केबीसीला मागे टाकले आहे आणि त्यामुळे केबीसीवरील कामगिरीचा दबाव वाढत आहे. या वाढत्या दबावामुळे अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’ला निरोप देतील का? हे पाहणं महत्तवाचं आहे.