आईच्या जातीच्या दाखल्याच्या आधारावरून मुलांनाही प्रमाणपत्र देण्याची मागणी मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केली आहे. यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. “आईची जात मुलांना लागू केल्यास देशात मोठा घोळ निर्माण होईल,” असं बच्चू कडूंनी म्हटलं होतं. बच्चू कडूंच्या विधानावर जरांगे-पाटलांनी भाष्य केलं आहे.
“आपली पुरूषप्रधान संस्कृती आहे. वडिलांची जात मुलाला आणि मुलीला लागू शकते. पण, आईची जात मुलांना लागू होत नाही. हा बदल फक्त एका जातीत होणार नाही, तर सगळ्यांसाठी करावा लागेल. आईची जात मुलांना लागू केल्यास देशात मोठा घोळ निर्माण होईल,” असं मत बच्चू कडूंनी मांडलं.
जरांगे-पाटील म्हणाले, “बच्चू कडूंकडून ही अपेक्षा नाही. शिष्टमंडळाशी चर्चा करताना बच्चू कडूही उपस्थित होते. बच्चू कडूंनी खरे आहे, ते बोलावं.”
“मुंबईत जाण्याबद्दल आम्ही अद्यापही जाहीर केलं नाही. सरकारलाच मराठ्यांनी मुंबईत यावं, असं वाटत आहे. तर, आम्ही मुंबईत येतो. मुंबईत सरकारनं कलम १४४ का लागू केलं? नोटीसा का बजावल्या आहेत?” असा सवाल जरांगे-पाटलांनी उपस्थित केला आहे.
“सरकारच्या शब्दाचा मराठा समाज सन्मान करत आहे. त्यामुळे नोटीसा बजावून विनाकारण मराठ्यांना डिवचू नये. २४ डिसेंबरपर्यंत मराठ्यांच्या नोदी आढळल्या आहेत. मराठा आणि कुणबी एकच असल्याचं सिद्ध झालं आहे,” असं जरांगे-पाटलांनी म्हटलं.