येत्या काही दिवसात राज्यासह देशातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने जारी केला आहे. पुढील पाच दिवसांत देशाच्या अनेक भागांत किमान तापमानात कोणताही महत्त्वपूर्ण बदल होण्याचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 26 फेब्रुवारीपासून पश्चिम हिमालयीन प्रदेशावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
यामुळे राज्यासह देशात अनेक भागात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे, 25 फेब्रुवारी ते 1 मार्च यादरम्यान पश्चिम हिमालयीन प्रदेशात तुरळक आणि वेगळ्या हलक्या पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता आहे. याशिवाय महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.भारतीय हवामान खात्याने (IMD) वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, पश्चिम हिमालयीन प्रदेशातील अनेक भागांमध्ये बर्फवृष्टीचा इशारा जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा आणि झारखंड या राज्यांमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, केरळमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आयएमडीच्या (IMD) अंदाजानुसार, 26 फेब्रुवारीला जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद आणि 26 आणि 27 फेब्रुवारीला हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये गडगडाट आणि विजांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.