चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. काल या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रसारित झाला. यामुळे प्रेक्षकांसोबतच या कार्यक्रमातील कलाकारांही भावनिक झाले आहेत. अभिनेता कुशल बद्रिके याने ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवरचा एक व्हीडिओ शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानलेत. तसंच काही चुकलं असल्यास माफ करावं असंही कुशलने म्हटलं आहे. कुशलचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. नेटकऱ्यांनी कमेंट करत ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमावर प्रतिक्रिया दिली आहे.
निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी. चुकले आमुचे काही आम्हा क्षमा असावी…, असं कुशलने या व्हीडिओत म्हटलं आहे. माय बाप प्रेक्षकहो, सगळ्यांचे मनापासून आभार. “चूक भूल द्यावी घ्यावी” असं म्हणत कुशलने चला हवा येऊ द्याच्या सेटवरचा व्हीडिओ शेअर केलाय. त्याचा हा व्हीडिओ पाहून प्रेक्षकही भावूक झाले आहेत. त्यांनी कुशलच्या व्हीडिओवर कमेंट केल्या आहेत.
बघता बघता कधी १० वर्ष झाली कळलं सुद्धा नाही… स्वतःचा दुःख बाजूला ठेवून, आम्हा प्रेक्षकांना तुम्ही सतत हसवलात… त्यासाठी मनःपूर्वक आभार… आता सांगायचं झालं तर, आपल्या घरातून कोणी बाहेर गेला , की कसा आपण त्याची वाट पाहत असतो… त्याच आश्याने आम्ही तुमच्या सर्वांची वाट पाहू…, असं एका प्रेक्षकाने कमेंट केली आहे. गेल्या 10 वर्षा मधे आम्हाला आमची दुःख विसरून चेहऱ्यावर हसू आणल्याबद्दल धन्यवाद… यापुढे पण असंच तुम्ही आम्हाला हसवत राहणार ही गॅरंटी आहे. धन्यवाद… आणि पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा…, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.