करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी जोरात

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. रोज लाखावर भाविकांची गर्दी होण्याची अपेक्षा असल्याने त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने तयारी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहूल रेखावार व पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी शुक्रवारी मंदिर परिसराची पाहणी केली. दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या वतीने यंदा दहा दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिराची रंगरंगोटी, विद्युत रोषणाई, स्वच्छता पूर्ण झाली आहे. मंदिर परिसरात सीसीटीव्ही लावण्यात आले असून काही ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत. शेतकरी संघाच्या इमारतीत दर्शन रांगेची सोय करण्यात आली आहे. महालक्ष्मी अन्नछत्राच्या वतीने रोज भाविकांना महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे. मंदिरात रोज धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासन व देवस्थान समितीच्या वतीने यंदा दहा दिवस दसरा महोत्स्वाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची उद्घाटन घटस्थापनेदिवशी होणार उद्घाटन- दसरा महोत्सवाला घटस्थापनेपासून सुरुवात होणार आहे. यादिवशी रविवार १५ ऑक्टोबर रोजी भवानी मंडप येथे सायंकाळी पाच वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ व श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत पर्यटन परिचय केंद्र व पर्यटन प्रदर्शनाच्या उद्घाटनाने महोत्सवाला प्रारंभ होणार आहे.

सोमवार १६ ऑक्टोबरला जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय व खासगी कार्यालयांमध्ये पारंपरिक वेशभुषा दिवस साजरा करण्यात येणार आहे. महोत्सवात १७ ते २१ ऑक्टोबर दरम्यान दसरा चौकातील रंगमंचावर सायंकाळी 6.30 ते 9 यावेळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. विविध क्षेत्रातील महिलांचा सहभाग असणारी शोभा यात्रा (बाईक रॅली) गुरुवार १९ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

या कौशल्यपूर्ण क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन मिळावे व सर्वांना या खेळांचा परिचय व्हावा, यासाठी २० व २१ ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे सकाळी ८ ते ११.३० व सायंकाळी ४ ते ७.३० यावेळेत भारतीय युद्धकला प्रात्यक्षिक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर कर्तृत्ववान ठरलेल्या कोल्हापुरच्या लेकीचा (महिलेचा) गौरव होणारा ‘करवीर तारा सन्मान’ कार्यक्रम सोमवार २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात होणार आहे.