महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार बदलण्यात आला आहे. शिवसेनेकडून हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. पण हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी विरोध केला होता. अखेर भाजपच्या दबावानंतर हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे.
शिवसेनेकडून हेमंत पाटील यांच्याऐवजी आता बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे शिवसेनेकडून पहिल्यांदाच अशाप्रकारे जाहीर झालेल्या उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी काल दिवसभरात प्रचंड बैठकांचं सत्र पार पडलं.
शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आणि वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी काल मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठकीसाठी गेल्या होत्या. हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली होती. पण हिंगोलीच्या भाजप आमदाराने त्यांच्या उमेदवारीला विरोध केलाय त्यामुळे ते सु्द्धा चिंतेत आहेत. तर नाशिकच्या जागेवर आधी भाजप आणि आता राष्ट्रवादीने दावा सांगितल्यामुळे हेमंत गोडसे यांची धाकधूक वाढली होती. अखेर हेमंत पाटील यांना ज्याची भीती होती तेच घडलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे.