आज स्वामी समर्थ प्रकट दिन विशेष…..

आज स्वामी समर्थ प्रकट दिन आहे. त्यानिमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा! श्री स्वामी समर्थ महाराज कधी प्रकट झाले? ते कोठून आले आणि कोण होते? याबद्दल कोणतेही अधिकृत दस्तऐवज नाहीत. पण एका उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, श्री स्वामी समर्थ महाराजांचा अवतार पंजाब प्रांतातील हस्तिनापूरपासून २४ किमी अंतरावर असलेल्या छेली खेडा नावाच्या गावात एका वटवृक्षाजवळ झाला असे मानले जाते.तर १८५६ मध्ये अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरात त्यांचे पहिल्यांदा दर्शन झाले, तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया तिथी होता, त्यानुसार या वर्षी १० एप्रिल रोजी स्वामीजींचा प्रकट दिन साजरा केला जाणार आहे.उपलब्ध माहितीनुसार, श्री स्वामी समर्थ महाराज हे इ.स. १८५६-१८७८ या कालावधीत होऊन गेलेले महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील दत्त संप्रदायातील एक थोर संत होते.

श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार मानले जातात. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्रीस्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले अशीही बर्‍याच भक्तांची श्रद्धा आहे. त्यांच्या प्रकट दिनानिमित्त अक्कलकोटमध्ये उत्सव साजरा केला जातो.इसवी सन १८५६ मध्ये चैत्र शुद्ध द्वितीयेला (शके १७७८) स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला व तिथल्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. येथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले.

स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामीसुत महाराजांनी सुरू केला. ज्यावेळी स्वामीसुत महाराज हा उत्सव अक्कलकोट मध्ये करत होते. तेव्हा भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला. स्वामीसुत हे काय करत आहेत तेव्हा स्वामींचे उत्तर होते. माझं बाळ मी सदेह प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे.नाना रेखी नावाचे अहमदनगरचे स्वामीभक्त होते ते स्वामीसुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते. ते पिंगला जोतिष्य विद्येत पारंगत होते. स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव, तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवण्याचं काम सुरू केलं.

काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील स्वामी प्रकटण्याचा मजकूर वर प्रमाणे होता. ती कुंडली घेऊन ते स्वामींपाशी आले तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता. तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली.कार्यक्रम संपल्यानंतर स्वामीनी पुन्हा कुंडली आणण्याची आज्ञा केली. तेव्हा त्या कुंडलीवर हळद, कुंकू, अक्षता, तुळस, फुले वैगेरे वाहून सर्वांनी त्या कुंडलीची पूजा केली . कुंडली पाहून स्वामींनी खूप खुश झाले. त्यांनी नानांचा उजवा हात हातात घेतला आणि त्याच्या हातावर विष्णुपद उमटले.

स्वामींचे आत्मलिंग नानांच्या हयातीपर्यंत त्यांच्या हातावर होते. स्वामींनी आपल्या प्रकटण्याला एक प्रकारे मान्यताच दिली आणि त्याचा प्रसाद म्हणून नाना रेखींच्या हातावर विष्णुपद उमटले. आजही स्वामींची ती कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे. स्वामी समर्थ महाराज कार्दलीवनात योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव ओळख लपवून चंचलभारती दिगंबर बुवा आशा नावाने सुद्धा कार्यरत होते. श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहेत असे मानले जाते. भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे.