सध्या निवडणुकीचा हंगाम आहे. सगळे राजकीय पक्ष प्रचाराला लागले आहेत. आम्ही सत्तेत आल्यास महागाई कमी (Inflation) करू. कमी पैशांत सोई-सुविधा देऊ, अशी आश्वासनं या पक्षांकडून दिली जात आहेत. मात्र हीच निवडणूक संपल्यावर देशातल्या सामान्य नागरिकांना चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे. निवडणूक संपल्यानंतर आपल्या जीवनात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मोबाईलचे रिचार्ज महागण्याची शक्यता आहे.
आगामी काही महिन्यांत देशातील दूरसंचार कंपन्या (Telecom Company) लवकरच आपल्या मोबाईल टॅरिफ प्लॅन्समध्ये (Mobile Tariff Plans) वाढ करणार आहेत, असे सांगितले जात आहे. तसे झाल्यास निवडणूक संपताच सामान्यांच्या खिशाला झळ बसू शकते.आज मोबाईल हा जवळपास प्रत्येकाच्याच आयुष्यातील अविभाज्य घटक झाला आहे. मोबाईल नसेल तर दिवसभरातील अनेक कामे खोळंबून जातात. 5 जी इंटरनेट आल्यापासून तर मोबाईलवरील अवलंबित्व जास्तच वाढलं आहे. मात्र याच इंटरनेट पुरवणाऱ्या दूरसंचार कंपन्या लवकरच आपले मोबाईल टॅरिफ प्लॅन्स वाढवण्याची शक्यता आहे.
लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर तसा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास आता मोबाईल वापरणे महागडे ठरण्याची शक्यता आहे. पीटीआयने अॅनालिस्ट अँटिक स्टॉक ब्रोकिंग या संस्थेच्या हवाल्याने तसे वृत्त दिले आहे. अँटिक स्टॉक ब्रोकिंग या संस्थेच्या म्हणण्यानुसार जिओ आणि एअरटेल यासारख्या प्रमुख दूरसंचार कंपन्या 2024 सालची लोकसभा निवडणूक संपताच आपले मोबाईल रिचार्च प्लॅन्स आणखी महाग करण्याची शक्यता आहे. हे प्लॅन्स सध्याच्या तुलनेत साधारण 15 ते 17 टक्के वाढण्याची शक्यता आहे.
या संभाव्य वाढीबाबत दूरसंचार कंपन्यांनी सध्याच काहीही सांगितलेले नाही. त्यामुळे दूरसंचार कंपन्यांच्या या आगामी धोरणाची शक्यता वर्तवली जात आहे. पण तसे होण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही.