सोलापूर जिल्ह्यात सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे. बायकोचा निर्घृणपणे खून करुन नवरा थेट पोलीस ठाण्यात हजर झाला. ही धक्कादायक घटना सोमवारी सकाळी स्वागत नगर वीटभट्टीसमोर उघडकीस आली. यास्मीन सैफन शेख (वय- ४०, रा.६०६ पाथ्रुड चौक, शहापूरे यांच्या घरात भाडेकरु, सोलापूर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
आरोपी पतीने पत्नीचा खून करून हत्यारासह स्वतःला एम आय डी सी पोलीस ठाण्यात जाऊन अटक करून घेतली. मृत महिलेचा मृतदेह शहरातील स्वागत नगर परिसरातील वीटभट्टी च्या आवारात मिळून आला. यातील मयत यास्मिन शेख ही महिला पाथ्रुड चौकातील शहापूरे यांच्या घरामध्ये पतीसह भाड्याने राहत होती.
रविवारच्या मध्यरात्रीनंतर १.३० च्या सुमारास महादेव केंगनाळकर यांच्या स्वागतनगर येथील दिकोंडा कॅन्टिनसमोर आलेल्या वीटभट्टीजवळ सदर महिलेच्या मनगटावर, पोटावर पतीने तिक्ष्ण हत्याराने वार करुन टाकल्याने ती बेशुद्धावस्थेत आढळूृन आली.दरम्यान, नवऱ्याने हत्यारासह एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून स्वत:ला अटक करवून घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
खबर मिळताच हवालदार एस. के. चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन बेशुद्धावस्थेतील महिलेला पहाटे तीनच्या सुमारास येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिची तपासणी केली, मात्र तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफन याची तीन लग्न झाली आहेत. यास्मीन ही सैफनची पहिली पत्नी होती. घरगुती कारणावरुन यास्मीन सैफनला सोडून गेली होती. काही दिवसांपूर्वी ती पुन्हा परत आली होती. त्यांना २१ वर्षाची मुलगी आहे. मुलीच्या लग्नाबाबत चर्चा सुरु होती. यास्मीनला दारुचे व्यसन होते. तसेच तिने कर्जही घेतले होते. कर्ज फेडण्यासाठी यासीन नेहमी सैफनकडे पैशांची मागणी करत होती. पत्नीकडून होणार्या मानसिक त्रासाला तो कंटाळला होता. त्याने रविवारी रात्री चाकूने भोकसून, वार करुन तिचा खून केला. तिचा मृत्यू झाल्यानंतर खूनात वापरलेला चाकू घेवून तो एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर झाला. या प्रकरणाचा सहायक पोलिस निरीक्षक चंदनशिवे तपास करीत आहेत.
यास्मीन हिने पती सैफन याला, मला तू ७० हजार रुपये कधी देणार आहेस, मला देणेकर्यांचे वारंवार फोन येत आहेत. पैसे दिले नाहीस तर तुझ्या घरच्यांना सोडणार नाही, अशी धमकी दिली. तसेच सैफन याच्या कानाखाली मारली. त्यावर सैफन याने कंबरेला खोचून ठेवलेला चाकू काढला आणि तिच्या पोटावर आणि मानेवर वार केले. तसेच दोन्ही हातांच्या मनगटांच्या नसा कापल्या.