कृष्णा नदीच्या काठावर वसलेले गाव वाळवा. इथे नदी दक्षिणोत्तर वाहते. पुढे पूर्ववाहिनी होते. येथे श्री १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर वाळवा (हाळभाग) आहे. येथे ३४ वर्षांनंतर नूतन जिनबिंब व मानस्तंभस्थित चतुर्मुख जिनबिंब पंचकल्याणक प्रतिष्ठा व विश्वशांती महायाग महोत्सव सोमवार, दि. १५ ते शुक्रवार, दि. १९ एप्रिलअखेर होत आहे.
हाळभाग-वाळवा येथील श्री १००८ भगवान आदिनाथ दिगंबर जिनमंदिराची स्थापना १९७५-७६ मध्ये झाली. अत्यंत थोडक्या जागेत मंदिर उभारले आहे. परिसरात जैन समाजाची शेकडो घरे आहेत; परंतु जागेची मोठी समस्या आहे. त्यामुळे मंदिरासाठी मानस्तंभ नव्हते. २०१९ मध्ये सांगली जिल्ह्यातील ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक वसंत देवाप्पा वाजे यांनी जागा घेऊन येथे मानस्तंभ बांधून दिले. या मानस्तंभाची पंचकल्याणक पूजा होत आहे.
गेली ४५ वर्षे जागेअभावी येथील मंदिरास
मानस्तंभ नव्हता. ही बाब लक्षात घेऊन वसंत वाजे यांनी जागा उपलब्ध करून मानस्तंभ स्वखर्चाने उभारून दिला. श्री शुभस्थान वाळवा (हाळभाग) येथे सद्धर्म प्रतिपालक व धर्मप्रभावक दिगंबर जैन श्रावक-श्राविकांनी न्यायोपार्जित धनाचा सदुपयोग करून श्रीमद् जिनबिंब व मानस्तंभ पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव व विश्वशांती महायाग महोत्सव करण्याचे निश्चित केले. जैन समाजाच्या मंदिरांसाठी मानस्तंभ अत्यंत महत्त्वाचे आहे.