धाकधूक वाढली……कोण उधळणार विजयाचा गुलाल?

राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या तीन टप्प्यात जवळपास 24 जागांसाठी मतदान पार पडले. उर्वरित दोन टप्प्यात 24 जागांसाठी मतदान होणार असून मंगळवारी तिसऱ्या टप्प्यातील 11 जागांसाठी मतदान पार पडले.त्यानंतर आता सर्वच पक्षांच्या नेतेमंडळीकडून आतापासूनच निकालाबाबत दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

त्यामुळे सर्वंच जणांची धाकधूक वाढली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी 4 जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असली तरी सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. कोल्हापूरकर शाहू महाराजांना साथ देऊन गादीचा मान राखतील, असा त्यांचा अंदाज आहे.

या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे. त्याचा फायदा विद्यमान खासदार संजय मंडलिकऐवजी शाहू महाराजांना होईल असे वाटते. बाणाच्या तुलनेत या ठिकाणी हात जोरात चालला आहे. हातकणंगले येथे माविआचे सत्यजित पाटील हे महायुतीच्या धैर्यशील माने यांना जड जातील, असा अंदाज आहे. माने यांनी गेल्या पाच वर्षात मतदारसंघात काम केले नसल्याने त्यांच्या विषयी नाराजी आहे. त्याचा फटका त्यांना बसू शकतो.

या ठिकाणी होत असलेल्या तिरंगी लढतीत मशाल बाजी मारणार आहे.सांगली मतदारसंघात तिरंगी लढत झाली. हेच कुणाला पचनी पडलेले दिसत नाही. या ठिकाणी संजय पाटील व विशाल पाटील यांना समान संधी असणार आहे. महविकास आघाडीचे चंद्रहार पाटील काहीसे बॅकफूटवर दिसत आहेत.

सोलापुरात प्रणिती शिंदे यांना राजकीय वारसा असला तरी गरीब कुटूंबातून राजकारणात आलेले राम सातपुते त्यांना चांगली लढत देऊ शकतात. याठिकाणी सातपूते यांनी अभाविपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात कामाला लावले होते. त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो.

माढ्यात यंदा धैर्यशील मोहिते पाटील यांना संधी मिळू शकेल, असा अंदाज आहे. या ठिकाणी मोहिते-पाटील कुटुंबाच्या बाजूने मतदार राहतील, असे वाटते. विद्यमान खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या अडचणीत या निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे जाणवते.सर्वच मतदारसंघातील अंतिम निकाल जाहीर होण्यासाठी येत्या ४ जूनची वाट पाहवी लागणार असल्याने तोपर्यंत उत्सुकता कायम असणार आहे.