स्पर्धा परीक्षांच्या प्रांगणात, राज्यसेवा मुख्य परीक्षा: सामान्य अध्ययन पेपर दोन : प्रशासन आणि नागरी सेवा

राज्यसेवा मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर दोन मधील बहुतांश मुद्द्यांच्या तयारीबाबत आपण मागील लेखांमध्ये पाहिले. या लेखामध्ये प्रशासन, पारदर्शकता, उत्तरदायित्व, ई-प्रशासन आणि नागरी सेवांची लोकशाही मधील भूमिका या मुद्द्यांच्या तयारी बाबत पाहू.

प्रशासन आणि नागरी सेवा या मुद्द्याची तयारी करताना विशेषतः पुढील आयाम पैलू विचारात घ्यावे लागतील –

प्रशासनामधील गाभाभूत प्रक्रिया
नागरी सेवांची भूमिका आणि प्रशासकीय सुधारणा
दबाव गट आणि त्यांची कार्यपद्धती
या मुद्द्यांवरील प्रश्न हे बहुतांश वेळा दोन तीन मुद्द्यांच्या परस्पर संबंधांवर आधारित असतील. उदाहरणार्थ ई प्रशासनाचे पारदर्शक प्रशासनातील महत्त्व. विशेषतः समकालीन घटना, योजना, चर्चेतील काही मुद्दे यांच्या आधारे प्रशासन, उत्तरदायित्व, नागरी सेवकांची भूमिका यांचे मूल्यमापन, समस्या, त्यांवर उमेदवारांची मते, उमेदवारांना सुचणाऱ्या उपाययोजना अशा प्रकारचे विश्लेषणात्मक प्रश्न या मुद्द्यांवर विचारले जाऊ शकतात. त्यामुळे प्रशासकीय रचना, शासकीय कार्यपद्धती, यातील नवीन संकल्पना हे पारंपरिक आयाम समजून घेणे आणि मग याबाबत स्वतःची मते विकसित करणे या मुद्द्यांच्या तयारीसाठी आवश्यक आहे.

प्रशासन

या मुद्द्याची तयारी करताना सर्वात आधी शासन आणि प्रशासन यामधील फरक समजून घेणे आवश्यक आहे. शासन म्हणजे राज्यघटनेमध्ये आपण शिकलेले कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ तर प्रशासनामध्ये या दोन्हींबरोबर नागरिकांच्या वेगवेगळ्या संस्था संघटना आणि अन्य हितसंबंधित यांचाही समावेश होतो.

प्रशासनाच्या बाबतीत संयुक्त राष्ट्र संघटना आणि प्रशासकीय सुधारणा आयोग यांच्याकडून प्रकाशित करण्यात आलेले अहवाल तसेच करण्यात आलेल्या चर्चा यांचा आढावा घेणे आवश्यक आहे.प्रशासनामधील वेगवेगळे आयाम, सुशासन राबविण्यासाठी आवश्यक असलेली नैतिक मूल्य तसेच सुशासन राबविण्यासाठी येणारे अडथळे आणि त्यावरील उपाय योजना यांच्याबाबत विश्लेषणात्मक प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार उमेदवारांनी आपली मते तयार करणे गरजेचे आहे.

सुशासन

सुशासन राबविण्यासाठी शासनाकडून राबविण्यात येणारे वेगवेगळे उपाय उमेदवारांना माहीत हवेत. विशेषतः माहितीचा अधिकार, सेवोत्तम मॉडेल, नागरिकांची सनद, ई-शासन, कर्मयोगी पोर्टल आणि महाराष्ट्राच्या विशेष संदर्भमध्ये लोकसेवा हमी कायदा यांबाबत मूल्यमापनात्मक मते तयार केली पाहिजेत.

प्रशासनामध्ये नागरिकांच्या सहभागासाठी करण्यात येणारे प्रयत्न त्यांची आवश्यकता त्यांचे यशापयश यांचा केस स्टडीच्या आधारे अभ्यास आवश्यक आहे. ई गव्हर्नन्सचा प्रसार करण्यासाठी शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या योजना, ई गव्हर्नन्सचे वेगवेगळे प्रकार, त्यांची परिणामकारकता, त्यांचे मूल्यमापन असे मुद्दे विचारात घ्यावेत.

नागरी सेवांची भूमिका

नागरी सेवांबाबतच्या घटनात्मक तरतुदी नागरी सेवांची रचना समजून घेणे हा मूलभूत अभ्यास झाला. नागरी सेवकांची लोकशाही मधील भूमिका अभ्यासताना काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर देणे गरजेचे आहे. नागरी सेवकांची निवडणुकीमधील भूमिका व जबाबदारी, त्यांची घटनेप्रतीची निष्ठा, त्यांचे कोणत्याही राजकीय पक्षाकडे न झुकता कामकाज करणे, धोरण निर्मितीच्या वेळी व्यवहारी आणि समतोल पद्धतीने विचार करणे, राजकीय अस्थैर्याच्या काळामध्ये प्रशासनामध्ये आणि कामकाजामध्ये स्थैर्य राखण्यांची जबाबदारी, कायदा निर्मितीमधील भूमिका, राजकीय पदाधिकाऱ्यांना योग्य निर्णय घेण्याकरिता सहाय्य करणे अशा मुद्द्यांच्या अनुषंगाने नागरी सेवकांचे लोकशाही मधील योगदान समजून घेणे गरजेचे आहे

नागरी सेवांशी संबंधित भ्रष्टाचार, निष्पक्षपातीपणाचा अभाव, राजकीय दबावस बळी पडणे, लोकसहभागाचा अभाव, नैतिकतेचा अभाव, कालापव्यय अशा वेगवेगळ्या समस्यांचा कारणे, स्वरूप, परिणाम आणि उपाय अशा आयामांनी विचार करणे गरजेचे आहे.

प्रशासकीय सुधारणा आयोग तसेच प्रशासकीय सुधारणांकरिताचे विविध उपाय यांची व्यवस्थित माहिती करून घ्यायला हवी. याबाबतच्या उत्तर लेखनासाठी वेगवेगळे अहवाल, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या चर्चा यांचा अभ्यास करून नोट्स काढणे फायद्याचे ठरेल.

दबाव गट

प्रशासनामध्ये परिणामकारक रित्या कार्यरत असलेला पण शासनाचा भाग नसलेला एक मोठा गट असतो तो म्हणजे दबाव गट. दबाव गट म्हणजे काय, त्यांचे महत्त्व, दबाव गटांकडून आपले हितसंबंध जोपासण्यासाठी आणि त्याकरिता शासकीय धोरणे, नियम बनवून घेण्यामध्ये करण्यात येणारे प्रयत्न व्यवस्थित समजून घेणे गरजेचे आहे. दबाव गट आणि राजकीय पक्ष यांच्या मधला फरक समजून घेऊन वेगवेगळ्या पद्धतीचे दबाव गट आणि त्यांचे मूल्यमापन लक्षात घ्यायला हवे. दबाव गटांचे लोकशाही प्रक्रियेमधील महत्त्व तसेच त्यांच्यामुळे लोकशाही प्रक्रियेमध्ये उद्भवू शकणारे अडथळे समस्या समजून घेऊन त्यावरील उपायांबाबत चिंतन करणे गरजेचे आहे. भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्र मध्ये कार्यरत असलेल्या दबाव गटांची माहिती असली असायला हवी.