आरोग्य विमा क्षेत्रात मोठ्या बदलाची नांदी येत आहे. गेल्या एक वर्षांपासून अनेक सोयी-सुविधांची घोषणा करण्यात आली आहे. IRDAI ने विमा कंपन्यांना ग्राहकभिमूख सुविधा पुरविण्यासाठी दबाव वाढवला आहे. आता आरोग्य विम्यात क्रांतीकारी पाऊल टाकण्यात येत आहे. लवकरच रुग्णालय आणि विमा कंपन्यांद्वारे एकाच विंडोच्या माध्यमातून सर्व आरोग्य विमा दावे हाताळले जातील. त्यासाठी नॅशनल हेल्थ क्लेम एक्सचेंजची (NHCX) स्थापना करण्यात आली आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (NHA) एनएचसीएक्स तयार केले आहे. त्याची चाचणी सुरु आहे. सध्या आरोग्य विमा विक्री करणाऱ्या कंपन्यांकडे क्लेम मंजुरीसाठी त्यांचा प्लॅटफॉर्म आहे.
सध्याची आरोग्य विमा क्लेमची प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ आहे. त्यात कंपनीची मनमानी पण दिसून येते. सध्या रुग्णालयात रुग्ण भरती झाल्यावर थर्ड पार्टी ॲडमिनिस्ट्रेटरद्वारे ही माहिती कंपनीकडे जाते. अथवा थेट कंपनीचे प्रतिनिधी मदत करतात. रुग्णालये कंपनीच्या क्लेम प्रोसेसिंग पोर्टलकडे रुग्णाची, खर्चाची माहिती पोहचवतात. प्री-ऑथंटिकेशनसाठी सर्व कागदपत्रे पाठविण्यात येतात.विमा कंपनी वा टीपीए त्यांच्या क्लेम प्रोसेसिंग पोर्टलवरुन अर्ज पडताळणी आणि इतर प्रक्रिया करतात. त्यानंतर दावा मंजूर करण्यासंबंधीची टीम त्याविषयीचा निर्णय घेते. यामध्ये पीडीएफ अथवा कागदपत्रांचा वापर होतो. ही प्रक्रिया खर्चिक आणि वेळखाऊ असते. यामध्ये अनेकदा रुग्ण आणि नातेवाईकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.
आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने टाईम्स ऑफ इंडियाला याविषयीची माहिती दिली आहे. त्यानुसार, आयुष्यमान भारत पीएम जन आरोग्य योजना लागू करण्यासाठी एनएचए आणि इरडा यांच्यामध्ये सहकार्य करार करण्यात आला आहे. IRDAI विमा क्षेत्रात अमुलाग्र बदलासाठी कटिबद्ध आहे. एनएचसीएक्स त्यात हस्तक्षेप करणार नाही. पण आरोग्य विमाबाबत ही संस्था पुढाकार घेणार आहे. त्यासाठी सिंगल विंडोचा पर्याय ग्राहकांना देण्यात येईल. त्यामुळे विमा दावे अधिक गतिमानतेने आणि पारदर्शक पद्धतीने हातवेगळे केले जातील.
सध्या विमा कंपन्याचे क्लेम प्लॅटफॉर्म आहेत. पण त्यात मानवीय चुकांमुळे अनेकदा ग्राहकांना क्लेम मंजूर करताना मनस्तापाचा सामना करावा लागतो. कंपन्या वेळेवर आणि जलद प्रक्रिया राबवत नाही. क्लेमची रक्कम कपात करतात. अथवा ग्राहकांना योग्य प्रतिसाद देत नाही. यावर NHCX हा मोठा दिलासा असेल. ग्राहकांना विमा कंपनीच्या चुकीच्या पद्धतीविषयी आणि सेवेत न्यूनतेविरोधात तक्रार करता येणार आहे.