आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत ॲसिडिटी होण्याच प्रमाण खूप वाढल्याचं दिसतं. थोडा चहा किंवा कॉफी जास्त झाली की डोकं दुखू लागतं, बाहेरचं काही खाल्लं की छातीत जळजळ, तोंड आंबट पडणे यासह अनेकांना मळमळ, कासावीस होणे, ढेकरा येणं अशा कितीतरी ॲसिडिटीमुळे होणाऱ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. अनेकजण यावर आराम मिळावा म्हणून अनेक प्रकारची औषधं घेतात. काही जण दूर्लक्षही करतात. पण ही समस्या कालांतराने वाढत जाऊन त्रास आणखी वाढतो. यासाठी काही घरगुती पदार्थांनी आराम मिळू शकतो.
केळी
केळी फळात अनेक नैसर्गिक अँटासिड असतात, जे पोटातील ॲसिडिटीचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात. तसेच फायबर आणि फॉस्फरस मोठ्या प्रमाणात असल्याने केळी खाल्याने पोटात थंडावा राहतो. सारखी भूक लागत नाही. आणि ॲसिडिटीचा त्रास कमी होतो.जर ॲसिडिटी झाल्यासारखे वाटू लागले तर एक केळी खाल्याने अॅसिडीटी बॅलेन्स होऊन पित्ताचा त्रास कमी होतो.
आल्याचा काढा
आलं हे अनेक औषधी गुणधर्मांनी भरलेले असते.आल्याचा एक तुकडा पाण्यात काही वेळ उकळून त्यात थोडी साखर आणि दालचिनीचा बारीक तुकडा टाकून एक कप पाण्याचे अर्धा कप पाणी होईपर्यंत उकळून हा काढा पिल्याने पित्तानंतर होणारी छातीतील जळजळ कमी होऊन लगेच आराम पडतो.
दही
अन्न पचनासाठी दह्याचं सेवन महत्वाचं मानलं जातं. दह्यामध्ये असणाऱ्या लॅक्टीक ॲसिडमुळे पोटात थंडावा निर्माण होऊन छातीत पित्त झाल्यानंतर होणारी जळजळ कमी होऊन आराम पडतो.